पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील हॉस्पिटलमध्ये ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टने सात मशिनसह ‘डायलिसीस’ सेंटर सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे.
आरोग्य योजनांमधून आणि कोणत्याही शासकीय योजनेत समावेश नसलेल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत ‘डायलिसीस’ करुन देण्यास संस्था तयार आहे. हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये संस्थेला सेंटरसाठी विनामुल्य जागा, वीज, पाणी महापालिकेमार्फत देण्यात येणार आहे. याबाबतच्या सदस्यपारित प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता देत प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव – बापुजीबुवानगर येथील सर्व्हे क्रमांक 9 मध्ये 200 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल साकारले आहे. हे हॉस्पिटल दोन एकर जागेत उभारले आहे. या हॉस्पिटलमध्ये जळीत (बर्न) रुग्णांसाठी 30 खाटांचा स्वतंत्र विभाग, सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी 170 खाटांची सोय असेल. या रुग्णालयाचे बांधकाम क्षेत्र पार्किंगसह 13 हजार 192 चौरस मीटर आहे. रुग्णालय सुरु केले असून सध्या तिथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने थेरगाव येथे डांगे चौकात गरीब रुग्णांसाठी गेल्या 4 वर्षांपासून ‘डायलिसीस’ सेंटर सुरु करण्यात आले आहे. महापालिकेमार्फत थेरगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या या 200 खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सात मशिनसह ‘डायलिसीस’ सेंटर सुरु करण्याची ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टने तयारी दर्शविली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ मिळवून ‘डायलिसीस’ मोफत होऊ शकेल. कोणत्याही शासकीय योजनेत समावेश नसलेल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत ‘डायलिसीस’ करुन देण्यास संस्था तयार आहे.
यामुळे शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून त्याचा फायदा होणार आहे. संस्थेचा सदहेतू पाहता ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टला थेरगाव हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये डायलिसीस सेंटरसाठी विनामूल्य जागा, उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी महापालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबतच्या सदस्यपारित प्रस्तावाला मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.