पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या रहाटणी-पिंपळे सौदागर मधल्या मिरचंदानी पाल्म्स या एकाच सोसायटीत तब्बल ४१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यात काही लहान मुलांचा ही समावेश आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता ही सोसायटी सील करण्यात आली असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात महिनाभरापासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने आपले डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. रहाटणी-पिंपळे सौदागरमधील मिरचंदानी पाल्म्स या एकाच सोसायटीत तब्बल ४१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. येथील बहुतांश रूग्ण होम क्वारंटाईन करण्यात आले असून महापालिका प्रशासन आणि सोसायटीच्या वतीने ही सोसायटी सील करण्यात आली आहे. या सोसायटीत सुमारे ३२५ फ्लॅट असून गेल्या ८ ते १० दिवसांत ही रूग्ण वाढ झाली आहे.
पिंपळे सौदागर सारख्या उच्चभ्रू परिसरात कोरोनाचा हा उद्रेक झाल्यामुळे शहरवासियांची चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने ही सोसायटी सील केली आहे. तसेच औषध फवारणी तसेच सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून या सोसायटीत कोरोनाचे रूग्ण भेटण्यास सुरूवात झाली होती. हे समजताच मी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला सूचना केली आणि तातडीने या सोसायटीत कोरोना टेस्टींग कॅम्प आयोजित केला. त्यात मोठ्या संख्येने रूग्ण आढळून आले. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यानंतर ही संपूर्ण सोसायटी सॅनिटायझ करून घेतली. लवकरात लवकर या सोसायटीतील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
नाना काटे – मा.विरोधी पक्षनेता