मुंबई (Pclive7.com):- दक्षिण आफ्रिकेहून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आलेल्या डोंबिवलीतील एका नागरिकाला ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग असल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. ‘ओमायक्रॉन’चा महाराष्ट्रातील हा पहिला, तर देशातील चौथा रुग्ण आहे.
‘ओमायक्रॉन’चे पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळले होते, तर तिसरा बाधित शनिवारी गुजरातमध्ये आढळला. आता चौथा रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ‘ओमायक्रॉन’चा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी ‘पीटीआय’ला दिली. या प्रवाशाने लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. तरीही त्याला परदेश प्रवासाची मुभा कशी दिली गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डोंबिवलीत आढळलेला हा ३३ वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईत आला होता. त्याला ताप असल्याने चाचणी केली असता तो करोनाबाधित आढळला. त्यानंतर त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून त्यामध्ये त्याला ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे आढळले. या रुग्णाला सौम्य लक्षणे आहेत. सध्या तो डोंबिवली येथील करोना केंद्रामध्ये उपचार घेत आहे. त्याच्या अगदी जवळून संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या १२ जणांचा आणि कमी जोखमीच्या २३ जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्ग झाला नसल्याचे सांगण्यात आले.
या रुग्णाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्यातील त्याच्या २५ सहप्रवाशांचीही तपासणी करण्यात आली असून यापैकी कोणालाही करोना नसल्याचे आढळले. याव्यतिरिक्त त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेण्यात येत आहे. डोंबिवलीचा रहिवासी असलेला हा रुग्ण व्यापारी नौदलामध्ये अभियंता असून कामानिमित्ताने केपटाऊनला गेला होता.























Join Our Whatsapp Group