मुंबई (Pclive7.com):- आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहरी यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळायला १९८२ साल उजाडावे लागले.
१९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहरी प्रकाशझोतात आले. त्यानंतर बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले.