पिंपरी (Pclive7.com):- मेट्रो प्रकल्पात काम करणारे अब्दुल शेख यांचा सहा महिन्यांचा थकलेला पगार पिंपरी युवासेनेच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे. कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी सांगितले.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220220-WA0007-300x300.jpg)
शहरांमधील मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. परंतु, या मेट्रोच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे कामगार वर्ग यांना ठेकेदाराकडून सहा सहा महिने पगार दिला जात नाही.
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे कामगार बांधवांना प्रत्येक महिन्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अब्दुल शेख नावाच्या कामगाराचा सहा महिन्याचा पगार दिले नसल्याचे वृत्त कानावर आले. त्याची दखल घेत पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके यांनी सदर घटनेची सविस्तर माहिती घेतली.
साईट सुपरवायझर शर्मा यांच्या मदतीने ठेकेदारास बोलून खडसावताच अब्दुल शेख यांचा सहा महिन्याचा थकित पगार अर्ध्या तासात त्यांनी दिला. त्याप्रसंगी अब्दुल शेख यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी युवा सेनेचे आभार मानले.
पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कुठल्याही कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या पाठीशी युवासेना सदैव खंबीरपणे उभी राहील, असे हाके यांनी सांगितले. अविनाश जाधव, मनोज काची, चिंचपा निंगडोळे, मोसीन शेख उपस्थित होते.