पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीत मिळकत करापोटी कर संकलन विभागाकडून ६२० कोटी २७ लाखांचे उत्पन्न सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जमा झाले आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात घटलेल्या उत्पन्नास यामुळे उभारी मिळणार आहे. गेल्या सन २०२१-२२ वर्षात एकूण ५५६ कोटींचा एकूण भरणा झाला होता.
शहरामध्ये ५ लाख ७० हजार मिळकतधारक आहेत. त्यापैकी गुरुवार (दि.३१) पर्यंत एकूण ३ लाख २४ हजार ५७२ मिळकतधारकांनी एकूण ६२० कोटी २६ लाख २३ हजार ५९७ रुपयांचा मिळकतकराच्या बिलांचा भरणा केला आहे. त्यात थेरगाव कार्यालयाने सर्वाधिक १३५ कोटी ७३ लाखांचा कर जमा केला आहे. त्या पाठोपाठ दिघी-बोपखेल ५३ कोटी १ लाख, सांगवी ५२ कोटी ४७ लाख, चिखली ५१ कोटी ५८ लाख आणि भोसरी कार्यालयातून ४६ लाख ९८ हजार रुपये भरणा झाला आहे. तर सर्वात कमी भरणा पिंपरी कॅम्प कार्यालयात फक्त ५ कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत.
मिळकत करापोटी जमा झालेल्या ६२० कोटीपैंकी ऑनलाइन माध्यमातून सर्वाधिक २८४ कोटी ८९ लाख जमा झाले आहेत. तब्बल २ लाख ३२२ जणांनी ऑनलाइन बिलींग केले आहे. त्यामुळे नागरिक दिवसेंदिवस ऑनलाइन पद्धतीच्या व्यवहारास अधिक पसंती देत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर धनादेशाद्वारे १३३ कोटी ९ लाख रुपये जमा झाले आहेत. रोखीने ८५ कोटी ५३ लाखांचा भरणा झाला आहे.
एप्रिलपासून मिळकतकराची बिले वाटपास सुरुवात..
शहरात एप्रिल २०२२ पासून मिळकतकराची बिले वाटण्यास सुरूवात केली जाणार आहेत. बिले स्पीड पोस्टाने घरोघरी पाठविली जाणार आहेत. शहरात घर घेऊन परदेशात राहणाऱ्या सदनिकाधारकांवर आता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तब्बल २ लाख ४५ हजार मिळकतधारकांनी बिले भरले नाही. त्यांचा शोध घेऊन त्यांना नोटीसा दिल्या जाणार आहेत. वसुली मोहिम सन २०२२-२३ आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यांपासून सुरू केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.