नवी दिल्ली (Pclive7.com):- अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे. मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आल्यानंतर जवाहिरी अल-कायदाचं नेतृत्व करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जवाहिरीने ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं. या हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवाहिरीच्या डोक्यावर २४ मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी सकाळी ड्रोन हल्ला केला असता त्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला.
जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. “कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार,” असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे. या हल्ल्यादरम्यान इतर कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती बायडन यांनी दिली आहे.
जवाहिरी काबुलमधील निवासस्थानाच्या बाल्कनीत असताना ३१ जुलैला त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बायडन यांनी २५ जुलैला या हल्ल्यासाठी संमती दिली होती. घरामध्ये जवाहिरीचं कुटुंबदेखील होतं. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
























Join Our Whatsapp Group