लोणावळा (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाली आहे. सोमवारी रात्री ही चोरी झाली आहे. कुलस्वामीनी एकविरा देवीच्या मंदिराला तीन वर्षापूर्वी एका भाविकाने सोन्याचा कळस मंदिराला अर्पण केला होता. दोन दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.
त्यानंतर मंगळवारी ही घटना उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच देवस्थानचे विश्वस्त, गुरव, स्थानिक नागरिक मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.