पिंपरी (Pclive7.com):- भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या योजनेतील जॅकवेल निविदा प्रक्रियेला विरोध वाढला होता. त्यात आता या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी थेट आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. त्याविषयीचे पत्र महापालिका आयुक्तांना देत यातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीने आंदोलन केल्याने भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्रामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.
भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली. जॅकवेलच्या निविदेत तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. भाजप म्हणतेय ‘ऑल इज वेल, पण भ्रष्टाचाराचा जॅकवेल, भाजपचा सदाचार अन् पाण्यातही भ्रष्टाचार अशी टीका करीत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापालिकेत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता.
त्या टीकेचा एकनाथ पवार यांनी जोरदार समाचार घेत प्रतिउत्तर दिले होते. एकनाथ पवार म्हणाले होते की, ‘जॅकवेलच्या कामाची निविदा २०२१ मध्ये प्रसिद्ध झाली. दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर दोन कंपन्यांनी निविदा भरली. त्यातील एक अपात्र झाली. निविदा स्वीकृती रकमेपेक्षा जास्त दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीला प्रशासनाने २ वेळा पत्र पाठवून दर कमी करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार कंपनीने १७ कोटी रुपये कमी करण्याची भूमिका घेतली. प्रशासनाने करातून खर्च होणारे १७ कोटी रुपये वाचवले. याबाबत प्रशासनाचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. हक्काचे पाणी अडवणाऱ्या राष्ट्रवादीच्या चुकीच्या धोरणामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी रक्ताचे पाट वाहिले. या कामात भ्रष्टाचार झाला असेल किंवा भाजप नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करावे, तर राजकारणातून सन्यास घेईल. जॅकवेल प्रकरणावरून महापालिकेतील वातावरण तापले आहे.
आमदार जगताप यांच्याकडून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी..
महापालिकेच्या वतीने जलउपसा प्रकल्पाचे बांधकाम करण्याकामी दोन-तीनवेळा यापूर्वी निविदा सूचना जारी केल्या होत्या. निविदा सूचना जारी केल्यानंतर कोणीही निविदा भरणार नाही, याची पाणीपुरवठा विभागाने काळजी घेतली होती. त्यानंतर कोणा एका कंत्राटदारासाठीच निविदा अटी व शर्ती शिथिल केल्या. निविदा प्रक्रियेत पात्रता निकष हे निष्पक्षपणे लावलेले नसून, एकाच कंत्राटदाराला या निविदेतील काम मिळावे म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्ग निवडला आहे. त्यामुळे या प्रकरणातील भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.
दरम्यान, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र प्राप्त झाले आहे. निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांची तपासणी करण्यास सांगितले आहे.