पिंपरी (Pclive7.com):- पुरोगामी चळवळीत काम करतो, याचा राग मनात धरत “तू तुझे हे चाललेले काम थांबव अन्यथा आज ना उद्या ‘तुझाही दाभोळकर करू.” अशी धमकी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी काळे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेड हि ‘सामाजिक-ऐतिहासिक प्रश्नांवर सत्यशोधकाची भूमिका घेणारी संघटना’ आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा दैदीप्यमान इतिहास, महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रचार-प्रसार करुन समाजात प्रबोधन घडविणे व समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून तत्पर असतो. प्रसंगी विविध कायदेशीर मार्गाने आम्ही प्रशासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. गेल्या अठरा वर्षांपासून आम्ही संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत.
दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी एका लग्नानिमित्त आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील रावेत मधील ‘मधुरा लॉन्स’ येथे कुटुंबासमवेत गेलो होतो. लग्न झाल्यानंतर रात्री 8:30 वाजताच्या सुमारास जेवणासाठी लाईनमध्ये थांबलेलो असताना, एका मुलाने माझ्याजवळ येत, तुम्हाला त्या समोर थांबलेल्या भाऊने बोलावले आहे, असे सांगितले. नंतर मी समोर पाहिले असता, सदर व्यक्ती ही मला हाताने स्वतःकडे येण्याचा इशारा करीत होती. मी त्याच्या जवळ गेलो, तर त्या व्यक्तीने माझ्याकडे रागाने बघत मला म्हटले, “ तू सतीश काळे आहेस ना ? मला ओळखलस का तू? मी अभिजीत शिंदे, पिंपरी गावात राहतो. बजरंग दलाचे काम करतो. खूप मस्ती आहे तुला. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेशी तुला काय देणं-घेणं पडलंय. आमच्या अनेक गोष्टींना तुमची संघटना विरोध करत असते. काही दिवसांपूर्वी तुला मी पिंपरी पालिकेत शिवजयंतीच्या मीटिंगमध्ये पाहिले होते, तेव्हाच मी तुला मारायचा ट्रॅप लावला होता परंतु माझी पोरं तिथे येई पर्यंत, तू तेथून निघून गेला होता. तू तेव्हा आमच्या तावडीतून वाचला आहेस, आता वाचणार नाहीस. तू तेव्हाच मरता-मरता वाचला. तू आता घरच्यांसोबत आलाय म्हणून तुला सोडतोय. पुन्हा कधी आम्हाला सापडलास, तर तुझे तुकडेच करतो. तू म्हणशील त्या ठिकाणी माझी ओळख आहे. खालपासून वरपर्यंत आमची सत्ता आहे. तू आमचं काहीच वाकडे करू शकत नाही. आमच्या हिटलिस्टवर तुझे नाव आहे. आम्ही तुला सोडणार नाही. तू तुझे हे चाललेले काम थांबव अन्यथा आज ना उद्या ‘तुझाही दाभोळकर सारखा शॉट’ करू.” असे म्हणत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत अभिजित शिंदे याने मला धमकी दिली. यापूर्वीही अनेक वेळा मला विविध माध्यमातून बजरंग दलाकडून जिवे मारण्याच्या तसेच माझा घातपात करण्याच्या धमक्या आलेल्या आहेत.
वरील गंभीर प्रकारामुळे भविष्यात सदर अभिजीत शिंदे या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळे किंवा त्याच्या हस्तकांमार्फत माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही प्रचंड मानसिक दडपणात आहोत. तरी या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सतीश काळे यांनी केली आहे.