राष्ट्रवादीचे नेते नाना काटे सावलीसारखे सोबत
पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी ट्वीट केलं आहे त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं होतं. दरम्यान, नॉट रिचेबल असलेले अजित पवार आज पुण्यात एका कार्यक्रमात दिसले आहेत.
काल अजित पवार सकाळी पुण्यात होते. पवारांनी पुण्यातील कार्यक्रम रद्द करत ते नॉट रिचेबल झाले आहेत अशा सर्वत्र चर्चा सुरू झाल्या होत्या. यावरून अजित पवार यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, प्रकृती अस्वस्थ झाल्यानं कालचे दौरे रद्द केले आहेत. कारण नसताना बदनामी नको असं अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पुणे येथील खराडी येथे एका ज्वेलर्सच्या उद्गाटनासाठी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दाखल झाले होते. यावेळी दोघांनी मिळून दागिन्यांची पाहणी देखील केली.
नॉट रिचेबल दादांसोबत नाना काटे..
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल होते. मात्र, ते पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे अजित पवार पुण्यात दाखल झाल्यानंतर जे मोजके सहकारी त्यांच्या सोबत होते. त्यामध्ये नाना काटे प्रामुख्याने सोबत होते. तसेच, पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांच्या सोबत दिसले. पुण्यातील खराडी-चंदननगर येथील ज्वेलर्सच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी अजित पवार आले होते. त्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार होत्या. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घेतली होती. या निवडणुकीत भाजपाला तगडे आव्हान देण्यात काटे यशस्वी झाले. निवडणुकीत पराभव झाला असला तरी, नाना काटे यांनी अजित पवार यांच्या ‘गुड बॉक्स’ मध्ये स्थान मिळवले आहे. अजित पवार यांचा निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जातात.