पिंपरी (Pclive7.com):- पत्रकार हा नेहमी अग्रभागी असतो, परंतु त्याला आवश्यक योग्य ते सहाय्य मिळत नाही हे कोविडच्या काळात दिसून आले. कोविड काळात अग्रभागी राहून काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी मी प्रयत्न केले अशा पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे सहाय्याची आवश्यकता आहे असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/05/IMG-20230512-WA0014-300x150.jpg)
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने वय वर्षे साठ वरील पत्रकारांना दरमहा 5000 रुपयांच्या पेन्शन योजनेचा शुभारंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते येथे केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ हे होते.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/05/IMG-20230415-WA0028-300x150.jpg)
यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की पिंपरीकर संघाने पेन्शन योजनेचा घेतलेला निर्णय अतिशय धाडसी व कौतुकास्पद आहे. पत्रकार संघ चांगले काम करत असल्याचे आपण पाहतो आहोत. संघाला चांगले सहकार्य करण्याचे माझे प्रयत्न असतील पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार भवन लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगून पत्रकार संघाला महाविद्यालयासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी आश्वासन दिले. पत्रकार हाउसिंग सोसायटीसाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांबरोबर चर्चा करू असे आश्वासनही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिले.
पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकार संघाच्या योजना खूप कौतुकास्पद आहेत. या योजना कार्यान्वित व्हाव्यात याकरिता आपण पाठपुरावा करू. लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील यांनी यावेळी बोलताना पत्रकार संघ खूप चांगले काम पहात आहे. मी स्वतः जी मदत हवी ती करण्यास तयार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी पत्रकारांना पेन्शन योजनेसारख्या अशा सहकार्याची का आवश्यकता आहे, हे विशद करत अशा योजनेसाठी पत्रकार संघाच्या वतीने स्वतंत्र विश्वस्त संस्था निर्माण करून हा उपक्रम कायमस्वरूपी राबविला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात उपस्थित त्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी केले.