पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्यप्रमुख पद कोणाला भेटणार याकडे सर्वच शहराचे लक्ष लागले होते. मात्र आज पुन्हा हा विषय सर्वसाधारण सभेत तहकूब करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
साडे चार वर्षापूर्वी राष्ट्रवादीने डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती केली होती. मात्र, ती चुकीची असल्याचे आताचे सत्ताधारी भाजपला वाटत आहे. राष्ट्रवादीच्या मर्जीतील डॉ.रॉय यांना दिलेली पदोन्नती चुकीची असल्याचा साक्षात्कार प्रशासन व विद्यमान सत्ताधारी भाजपला साडेचार वर्षांनी आता झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या विधी समितीने डॉ.रॉय यांना दिलेली पदोन्नती चुकीची असल्याचा ठराव केला. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य व वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांना डावलून डॉ.रॉय यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती करण्यात आल्याचे विधी समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे साळवे यांना आरोग्यप्रमुख करावे, अशी शिफारसही विधी समितीने केली होती. हा विषय अंतिम मंजुरीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका सभेपुढे होता. मात्र आज पुन्हा हा विषय तहकूब झाल्याने यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.