पिंपरी (Pclive7.com):- फाल्गुन शुद्ध चतुर्थी अर्थात विनायकी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर (दि.१३) रोजी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आणि डॉ. प्रमोदजी चौधरी यांच्या सहकार्याने श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरात मोरया भक्तांना प्रसाद वाटप करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या “श्री मोरया सभामंडप” या वास्तूचे डॉ. प्रमोदजी चौधरी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मंगल प्रसंगी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या लोकाभिमुख उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या एकुणच कामाचे कौतुक केले आणि अशा प्रकारच्या लोकाभिमुख उपक्रमाची सुरवात केली यासाठी समाधान व्यक्त करतानाच या उपक्रमात आवश्यक त्या ठिकाणी चिंचवड देवस्थान ट्रस्टला योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
डॉ. प्रमोदजी चौधरी म्हणाले की, आपण अनेक वर्षे श्री मोरया महाराजांच्या दर्शनाला येत आहोत, श्री मोरया वर आपली नितांत श्रद्धा आहे, त्यामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी या उपक्रमासाठी सहकार्य करण्या संदर्भातील प्रस्ताव मांडला तेव्हा आपल्या हातून श्री मोरयाची काही तरी सेवा घडणार आहे आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या प्रसाद वाटपाच्या या पुण्यकर्मात आपला देखील खारीचा वाटा असावा या विचाराने देवस्थान ट्रस्टच्या या प्रस्तावाला मी तात्काळ होकार दिला. आणि आज या मोरया सभामंडपाचे उद्घाटन झाले याचा मनस्वी आनंद झाला, अशा प्रकारची भावना व्यक्त केली.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केला. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त क्रमांक २ जितेंद्र देव यांनी आपल्या प्रास्ताविकात या सदर उपक्रमासंदर्भात देवस्थानची भूमिका आणि माहिती दिली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित मोरया भक्तांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लांडगे यांनी केले.
या प्रसंगी मोरया सभामंडपाचे काम अतिशय कमी वेळात आणि अत्यंत चांगल्या प्रकारे पुर्ण केल्या बद्दल प्राज इंडस्ट्रीजचे आर्किटेक्ट, इंजिनिअर, तंत्रज्ञ यांचा देखील सत्कार देवस्थानच्या वतीने करण्यात आला. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कारभारी किशोर जोशी, श्री. मेढेकर, मंदिराच्या व्यवस्थापिका सौ. कुलकर्णी मॅडम, देवस्थान ट्रस्टचे सर्व कार्यालयीन व सुरक्षा कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
उद्घाटन झाल्यावर डॉ. प्रमोद चौधरी, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, ॲड मोरेश्वर शेडगे, यांच्या हस्ते श्री मोरया भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. अशा प्रकारे श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरात अन्नदान प्रसाद वाटप सुरू करावे ही मोरया भक्तांची अनेक दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी मोरया गोसावी देव मंडळाचे अध्यक्ष ॲड नरेंद्र देव, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड जिल्हा उपाध्यक्ष निरंजन देव, ऋषिकेश देव, संजीव देव, प्रदीप देव, स्वप्नील देव, अजय देव व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. इथून पुढे दर रविवारी आणि दर मंगळवारी संध्याकाळी श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांची आरती होउन अन्य प्रसाद व दर संकष्टी चतुर्थीला नियमित खिचडी वाटप याच श्री मोरया सभामंडपात होईल मोरया भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा हे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी केले.