पिंपरी (Pclive7.com):- पवना नदीच्या पात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कडक कारवाईची मोहीम सुरू आहे. रावेत, निगडी आणि परिसरातून मोठ्या वाहनातून नदीच्या कडेला राडारोडा टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने छापा टाकून दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत, निगडी, आणि आजुबाजूच्या भागांतून दररोज ट्रक, हायवा, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो- ४०७, आर.एम.सी. प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशी वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकत होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने कारवाई करत सापळा रचून या सर्व वाहनचालकांवर दिनांक २९/०४/२०२४ व दिनांक ३०/०४/२०२४ रोजी कारवाई केली.
नदीपात्रालगत राडारोडा टाकल्याप्रकरणी रफीक सोफीलाल शेख (टेम्पो वाहन क्र.एम.एच.०४/सी.जी. ३५०१), अमित साखरे, (हायवा वाहन क्रमांक. एम.एच.१४/एच.यु.७०४७), अशी दोन वाहने पकडून अनुक्रमे १०,०००/- व १,२६,७६०/- दंड असे एकुण १ लाख ३६ हजार ७६० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल पाटील कनिष्ठ अभियंता, अमोल गोरखे आरोग्य निरीक्षक, गोरक्षनाथ करपे मल्टी पर्पज वर्कर यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण विभागाचे तसेच एमएसएफ व मेस्को जवानांचे पथक यांची मदत घेवून कारवाई करण्यात आली आहे.
यापुढेही अशा प्रकारे नदी नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल असा इशारा पर्यावरण विभागामार्फत देण्यात आला आहे.