नवी दिल्ली (Pclive7.com):- भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच टी-२० विश्वचषकात विजय मिळविल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाच्या शोधात होती. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या पदासाठी इच्छुक होता. त्यासाठी त्याने मुलाखतही दिली होती. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. गौतम गंभीरचा कार्यकाळ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. तो डिसेंबर २०२७ पर्यंत या पदावर राहिल. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांकरिता प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्याच्यावर राहणार आहे.
जय शाह यांनी एक्सवर पोस्ट करत ही बातमी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचे नाव जाहीर करताना मला आत्यंतिक आनंद होत आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने बदलले आहे आणि गौतम या बदलांचा साक्षीदार राहिला आहे. गौतमने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका वठविल्या आहेत. त्याने आजवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तो यापुढे भारतीय संघालाही पुढे नेईल. तसेच हे करण्यासाठी तो आदर्श व्यक्ती वाटतो.”
“गौतम गंभीरची दूरदृष्टी आणि त्याचा अफाट अनुभव त्याला मुख्य प्रशिक्षकपदासाठी योग्य दावेदार ठरवतो. बीसीसीआयकडून गौतम गंभीरच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा”, अशा शब्दांत जय शाह यांनी गौतम गंभीरचे स्वागत केले आहे.