पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच खुल्या गटातील महिलांसाठी राखीव जागांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.२७) जाहीर केला आहे. या आरक्षण सोडतीचा प्रक्रियेतील नियोजन ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाला दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ३२ प्रभाग असून, त्यांत १२८ सदस्यीय जागा आहेत. या प्रभागरचनेतील सहा प्रभागांमध्ये बदल झाला असून, लोकसंख्येबरोबरच एससी व एसटी लोकसंख्येची नवीन आकडेवारी लक्षात घेऊन आरक्षणातही बदल केला आहे.
आरक्षण सोडतीचा निकाल आयोगास पाठवण्याचे निर्देश
राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीसाठी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत राखीव जागांची संख्या निश्चित करून मान्यता घेण्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी या सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाईल, तर ११ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडतीचा निकाल आयोगाला पाठवण्याचे निर्देश आहेत.

असे असेल आरक्षण..
एससीसाठी २०, एसटीसाठी ३, तर ओबीसी व खुल्या गटातील जागांवर प्रत्येकी ३५ जागा महिलांना राखीव राहतील. प्रभागातील अ, ब, क, ड या जागांची वाटणी आणि १२८ जागांपैकी कोणत्या जागा महिलांसाठी राखीव असतील, हे सोडतीनंतर स्पष्ट होईल. खुल्या गटात पुरुष, महिला दोघेही अर्ज करू शकतात, तर राखीव जागांवर पुरुष उमेदवार लढू शकत नाही.
























Join Our Whatsapp Group