भोसरी (Pclive7.com):- “आता हवा बदल नवा..” यासह अनेक टॅगलाईनचे फ्लेक्स सध्या भोसरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित गव्हाणे यांनी मतदारसंघात फ्लेक्स बाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शनासह यंदाच्या निवडणुकीत “बदल हवा” असं मतदारांना साकडं घातलं आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील मितभाषी, सुसंस्कृत आणि विकासाचा दृष्टिकोन, तसेच क्लीन चेहरा असलेला एक युवा नेतृत्व आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते तीव्र इच्छुक आहेत. नुकताच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवार गटात प्रवेश केला. अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभेतील दोन माजी महापौर आणि तब्बल २८ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला. भोसरी विधानसभेची जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटल्याचा दावा देखील त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आहे. त्याच अनुषंगाने अजित गव्हाणे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकत संपूर्ण मतदारसंघात जोरदार फ्लेक्सबाजी करत शक्ती प्रदर्शन केले आहे.
“आता हवा बदल नवा”, “निर्धार संघर्षाचा निश्चय परिवर्तनाचा”, “आपले एक मत भोसरी विधानसभेत परिवर्तन घडवू शकते”, “संधी परिवर्तनाची योग्य नेतृत्वाची” अशा टॅगलाईन द्वारे त्यांनी मतदारसंघात फ्लेक्सबाजी केली आहे. सध्या चौका चौकात उभारण्यात आलेल्या या फ्लेक्सची भोसरी मतदारसंघात चांगली चर्चा रंगू लागली आहे. खरंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार का? अशी चर्चा देखील सर्वसामान्य नागरिकांत सुरू झाली आहे.