पिंपरी (Pclive7.com) :- ‘चाळिशीनंतरच्या वेश्यांचे जीवन एक चिंतन’ या विषयावर व ‘आफ्टर ४०’ या वेश्यांच्या जीवनावरील शॉर्ट फिल्मचा विशेष शो येत्या शनिवारी ( दि.३१) रोजी पिंपरीत होणार आहे. पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार कै. भा.वि. कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पिंपरीतील अॅटो क्लस्टर सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लांडगे यांनी दिली.
या परिसंवादामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अनिल अवचट, पुण्याच्या पोलीस उपायुक्त व लेडी सिंघम अशी प्रतिमा असलेल्या ज्योती प्रिया सिंग, सामाजिक कार्यकर्त्या व तृतीयपंथी कवियत्री दिशा पिंकी शेख आणि वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन केंद्र चालविणार्या ज्योती पठानिया यांचा सहभाग असणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवडमधील नवोदित कलाकारांनी एकत्र येऊन वेश्यांच्या जीवनावर बनविलेली ‘आफ्टर ४०’ ही शॉर्टफिल्मही यावेळी दाखविण्यात येणार आहे. या फिल्मचे लेखन व दिग्दर्शक विजय जगताप यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्रसृष्टीचा प्रारंभ करणारे कै. भा.वि. कांबळे यांच्या अष्टपैलू कार्याला समोर ठेऊन व उपेक्षित वर्गाविषयीची त्यांची जीवनभरातील धडपड विचारात घेऊन त्यांच्या समाजरूपी कार्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती पत्रकार अरूण कांबळे यांनी दिली.
समाजाने दुर्लक्षिलेला हा विषय व ही वेदना शहरात प्रथमच फिल्म व परिसंवाद अशा दुहेरी माध्यमातून प्रकट होणार आहे. डॉ. अनिल अवचट हे संवेदशील लेखक म्हणून परिचित आहेत. आपल्या विविध पुस्तकांमधून वेश्यांचे जीवन, त्यांच्या समस्या व प्रश्नांची त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यांची मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्र ही पुण्यातील देश विदेशात नावाजलेली संस्था व्यसनमुक्ती कार्यासाठीचे ‘आयडॉल’ म्हटले जाते. तर धाडसी, बंडखोर अशी प्रतिमा असलेल्या पुण्यातील आयपीएस अधिकारी ज्योती प्रिया सिंग या पोलीस उपायुक्त म्हणुन शहरात काम करीत आहेत. आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाच्या पुण्यातील रॅकेटचा पर्दाफाश करणार्या व गरजू व गरीब महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणार्या दलालांना पळता भूई थोडी करणार्या ज्योती प्रिया सिंग या आपले अनुभव यावेळी उलगडणार आहेत.
याचबरोबर वेश्यांना वृद्धावस्थेत आधार देणार्या व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मोशी येथे केंद्र स्थापन करून दोन दशकांहून अधिक काळ कार्य करीत असलेल्या ज्योती पठानिया यांचाही या परिसंवादात विशेष सहभाग असणार आहे.
तर आपली तृतीयपंथी ओळख अभिमानाने मिरवणारी व परखड व स्पष्ट विचारांची कवियत्री अशी महाराष्ट्रभर ओळख असलेली दिशा पिंकी शेख या परिसंवादाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. वेश्यांचा चांगला व वाईट काळ अशा दोन्ही काळांची सखोल माहिती असलेली दिशा आपल्या अनुभवांचे विविध पदर यावेळी उलगडून सांगणार आहेत.