नागपूर (Pclive7.com):- उन्हातानातूनही कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना गारेगार वाटवे यासाठी विशेष जॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. या जॅकेटमुळे बाहेरील तापमानापेक्षा ६ अंशांपर्यंत कमी तापमान राखण्यास मदत होते. त्यामुळे तप्त उन्हातही पोलिसदादा ‘कूल’ राहू शकणार आहेत. प्रायोगित तत्त्वावर २० वाहतूक पोलिसांना हे कूल वेस्ट जॅकेट देण्यात आले आहे. दरम्यान, अशाप्रकारचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांच्या या कूल वेस्ट जॅकेटची पाहणी केली. येत्या काळात शहरातील इतरही पोलिसांना जॅकेट देण्याचा पोलीस विभागाचा मानस आहे. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या मानवी संसाधन विभागामार्फत हे कूल वेस्ट जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कूल वेस्ट जॅकेट बाहेरील तापमानापेक्षा ६ अंश तापमान कमी राखते. शिवाय, १ ते २ मिनिटांतच कार्यान्वित होणारे हे जॅकेट वजनाला हलके असून पोलिसांना हाताळण्यास सोपे आहे. ‘या जॅकेटचे नाव कूल वेस्ट असून, यात एक विशिष्ट मटेरीयल वापरण्यात आले आहे.
या जॅकेटला थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवावे लागते. त्यानंतर जॅकेटमध्ये असलेले विशिष्ट मटेरीयल पुढचे तीन ते चार तास तापमान नियंत्रित ठेवते. शिवाय, यामुळे पोलिसांनी घातलेला युनिफॉर्म ओला होत नाही, अशी माहिती ट्रॅफीक पोलीस उपायुक्त चैतन्य एस यांनी दिली.
कूल वेस्ट जॅकेटसोबतच ट्रॅफिक पोलिसांचे डोकेही थंड रहावे, म्हणून एक कूल टोपी देण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी त्यांच्या युनिफॉर्मच्या कॅपच्या आत ही टोपी ठेवतो. त्यामुळे शरीराला तर उन्हामुळे हानी होत नाही. शिवाय, पोलिसांचे डोकेही थंड राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात नागपूरसह विदर्भात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते. यामुळे सर्वसामान्य लोक उन्हात बाहेर पडल्यास त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. ट्रॅफिक पोलीस तर भरउन्हात ८ ते १२ तास काम करतात. त्यामुळे दर उन्हाळ्यात पोलिसांना उष्माघातासारख्या उन्हापासून होणाऱ्या आजाराचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी नागपूर २० ट्रॅफिक पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट देण्यात आले आहे.