पिंपरी (Pclive7.com):- सुप्रसिध्द पत्रकार व बंगळुरु येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणाचे पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. चिंवडगावातील अमोल काळे या संशयिताला विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) कर्नाटकमधून अटक केली आहे. बंगळुरुमधील आरआरनगरमध्ये ५ सप्टेंबर २०१७ मध्ये घरासमोर गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती.
कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधी लिखाण करणा-या गौरी लंकेश हत्या प्रकरण देशभरात चर्चेला विषय ठरले आहे. या हत्ये प्रकरणातील आरोपी के. टी. नवीनकुमार यांच्या विरोधात एसआयटीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. त्याने गोळ्या झाडणा-यांना लंकेश यांच्या घरापर्यंत नेणे व मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावल्याचे आरोपपत्रात म्हटलेले होते. त्यानंतर या हत्ये प्रकरणात अमोल काळे उर्फ भाईसाहब उर्फ संजय भन्सारे (वय ३९, रा. चिंचवडगाव), अमित देगवेकर उर्फ प्रदीप महाजन (वय ३८), मनोहर येडावे उर्फ मनोज (वय २८) या तिघांसह एकूण पाच संशयितांना गुरुवारी (दि.३१) एसआयटीने अटक केली.
या अटकेनंतर लंकेश हत्ये प्रकरणाचे पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. अटक केलेल्या पाच संशयितांपैकी अमोल काळे हा चिंचवडमधील माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझाचा रहिवाशी आहे. तसेच, एसआयटीने अटक केलेले हे चार जण सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबधित असल्याचेही पोलिस यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.