

– बाळासाहेब जवळकर (ज्येष्ठ पत्रकार)-
पिंपरी (Pclive7.com):- आर्थिक मर्यादा, प्रेक्षकांचा अत्यल्प अत्यल्प प्रतिसाद, प्रतिस्पर्धी हिंदी सिनेमांचे आक्रमण, इंग्रजीसह देशा-विदेशातील इतर भाषिक ‘बिग बजेट’ चित्रपटांशी थेट स्पर्धा, ‘सोशल मिडीया’चे गारूड अशा प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल सुरू आहे.

आतापर्यंतच्या प्रवासात मराठी चित्रपटांनी अनेक नवे टप्पे पार केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही मराठी सिनेमांनी लक्ष वेधले. चालू वर्षात (२०२५) ‘गुलकंद’, ‘आता थांबायचे नाही’, ‘जारण’, ‘दशावतार’ अशा सिनेमांनी तिकीट खिडकीवर मोठं यश मिळवत प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचून आणलं, हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. जुन्या चौकटी मोडून नव्या वाटा शोधणं, अडथळे पार करून क्षितिजाच्या पलीकडे झेप घेणं म्हणजे सीमोल्लंघन होय.

मोजक्याच सिनेमांना चांगले यश..
एखादं दुसरा अपवाद वगळता मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होत नाहीत. गेल्या दहा महिन्यांत कितीतरी मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतकेच यशस्वी होऊ शकले.

‘गुलकंद’, ‘आता थांबायचे नाही’ ‘जारण’, ‘दशावतार’ अशी काही प्रमुख उदाहरणे देता येतील. ज्या सिनेमांमुळे सोशल मिडीयाच्या प्रभावकाळातही मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये आले. उत्तम प्रतिसादामुळे ते अनेक आठवडे थिएटरमध्ये चालले. यातील काही सिनेमांना ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरही पसंती मिळाली.

गेल्या दशकभराचा विचार करता ‘कट्यार काळजात घुसली’, ‘डबल सीट’, ‘सैराट’ ‘नटसम्राट’ ‘क्लासमेटस्’ ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ ‘मुळशी पॅटर्न’ ‘दगडी चाळ’ ‘झिम्मा’ ‘पावनखिंड’ ‘धर्मवीर’ ‘वेड’ ‘बाई पण भारी रं’ ‘नाच गं घुमा’ अशा काही मोजक्याच सिनेमांना चांगले यश मिळाले.

अनेक चांगले सिनेमे पडले. ‘पैसा रे पैसा ३’ सारखा मोठी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी नाकारले. मोठी नावे म्हणजे यशाची खात्री नव्हे. तसेच, मराठी-मराठी म्हणून प्रेक्षकांच्या माथी काहीही मारले, तरी ते खपवता येते, असे होत नाही, हेच याद्वारे अधोरेखित झाले.

कमी बजेटमुळे दर्जावर परिणाम..
कमी बजेट हे मराठी चित्रपटांचे सर्वात मोठे आणि कायमचे दुखणे आहे. पुरेशा बजेटअभावी बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. त्याचा थेट परिणाम चित्रपटांच्या दर्जावर होतो. कलाकारांना योग्य मानधन देता येत नाही. प्रभावी लोकेशन्स् निवडली जात नाही. प्रमोशन, मार्केटिंग अपेक्षेप्रमाणे होत नाही. सिनेमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून प्रेक्षकही सिनेमागृहांपर्यंत येत नाहीत.

सुमार दर्जाचे कित्येक सिनेमे तयार होतात. ते कधी येतात आणि जातात, याचा थांगपत्ताही लागत नाही. त्याच त्या प्रकारातील रटाळ, साचेबध्द आणि विनोदी चित्रपटांना प्रेक्षक पुरते कंटाळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मराठी प्रेक्षक घरच्या सिनेमांपासून दुरावला आहे. त्यातच करोना संकटकाळापासून ‘ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना देशाच्या विविध प्रांतातले त्याचप्रमाणे जगभरातील चांगले आणि दर्जेदार सिनेमे पाहण्याचे पर्याय खुले झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती आणि प्राधान्यक्रम बदलला आहे.

अडचणींचा डोंगर..
अनेक संकटांमुळे मराठी चित्रपटसृष्टी अडचणीच्या काळातून जात आहे. मोठ्या व्यावसायिक कंपन्या, वित्तीय संस्था, प्रस्थापित निर्माते हे मराठी सिनेमांवर पैसा लावण्याचे धाडस करत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एखाद्याने सिनेमा तयार केलाच, तर त्याच्यापुढे बऱ्याच समस्या वाढून ठेवलेल्या असतातच. मराठी सिनेमांसाठी थिएटर मिळत नाही. चुकून मिळालेच तर चांगले शो मिळत नाही. निर्मात्यांमध्ये एकजुटीचा आणि समन्वयाचा अभाव असतो. म्हणूनच एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. परिणामी सर्वांचेच नुकसान होते. या समस्येवर सातत्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असते. मात्र कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही. थिएटर्स मिळाले नाहीत, या कारणास्तव ‘टीडीएम’ हा मराठी सिनेमा जाहीर केलेल्या तारखेला प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्याचे प्रदर्शन लांबणीवर टाकावे लागले. ही प्रातिनिधीक घटना आहे. असे वेगवेगळे अनुभव अनेकांनी घेतले आहेत.

प्रयोगशीलतेपेक्षा सुरक्षित खेळ..
मराठीत सिनेमासृष्टीला कंपूशाहीचे ग्रहण लागले आहे. चांगला कलावंत आहे म्हणून एखाद्याला काम मिळेलच, याची खात्री नाही. सर्वार्थाने सोयीच्या कलाकाराचीच वर्णी लावली जाते. गुणवत्ता असणाऱ्या कलाकारांना डावलण्यात येत असल्याने कित्येक चांगले कलाकार प्रवाहाबाहेर फेकले गेले, काही दुसऱ्या क्षेत्राकडे वळले. नवे चेहरे पुढे आणण्याची जबाबदारी निर्माते-दिग्दर्शकांची आहे. मात्र, प्रयोगशीलतेपेक्षा सुरक्षित खेळ बरा म्हणून त्याच त्या चेहऱ्यांची निवड केली जाते.

मराठीचे कंबरडे मोडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीत बहुतांश मराठी कलाकारांना दुय्यम भूमिका दिल्या जातात. दाक्षिणात्य अभिनेते हिंदीत दिमाखदारपणे प्रवेश करतात. मराठीचे सुपरस्टार म्हणवणारे हिंदीत नोकरांच्या भूमिका करण्यात धन्यता मानतात. हे चित्र मराठी प्रेक्षकांच्या मनाला वेदना देणारे ठरते.

मोठ्या स्टार्सचे हिंदी, तमिळ, तेलुगू किंवा इंग्रजी चित्रपटांसमोर मराठी सिनेमे प्रदर्शित होतात. या तीव्र स्पर्धेचा जबर फटका मराठी सिनेमांना बसतो. ‘बाहुबली’ ‘पुष्पा’ ‘केजीएफ’ ‘पठाण’ ‘जवान’‘कांतारा’ ‘स्त्री’ ‘छावा’ असे सिनेमे ब्लॉकबस्टर करण्यात आणि त्या निर्मात्यांना करोडो रूपये कमवून देण्यात मराठी प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. मग, मराठी सिनेमांच्या बाबतीत त्यांची उदासीनता का असते.

सलमान, शाहरूख, आमीर, अक्षय, अजय देवगण असो किंवा दक्षिणेतील नायकांचे तद्दन फालतू सिनेमे असोत, त्यांना पसंती देणारा महाराष्ट्रीयन माणूस मराठी सिनेमांकडे पाठ फिरवतो. घरच्या प्रेक्षकांनीच ठेंगा दाखवला तर मराठी सिनेमे जगणार तरी कसे, मराठी सिनेमासृष्टीवर अवलंबून असलेल्या हजारो लोकांनी मग काय करायचे, मराठी माणसांनी सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे पाहणे हेच खऱ्या अर्थाने पाठबळ आहे. ते आपण सर्वांनी दिलेच पाहिजे. याखेरीज, ‘पॉवरफुल्ल’ राजकारण्यांनी मराठी कलाकारांना स्वत:च्या सोयीसाठी वापरण्यापलीकडे मराठी चित्रपटसृष्टीला फायदेशीर ठरेल आणि कलाकारांना बळ मिळू शकेल, असे धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे.

सर्वांनी मनापासून ठरवले तर…
सध्याच्या तीव्र चढाओढीत टिकून राहण्यासाठी मराठी सिनेमांचा उत्तम दर्जा आवश्यक आहे. नव्या पिढीला आकर्षित करणारे चित्रपट यायला हवेत. रिमेकचा मोह टाळायला हवा. नवोदित दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना प्रोत्साहन दिले पाहिजे. वितरण आणि प्रचाराचे महत्त्व ओळखून चांगल्या चित्रपटांना योग्य प्रेक्षकवर्ग मिळवून देण्यासाठी मार्केटिंग आवश्यक आहे. जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ओटीटी ही मोठी संधी आहे. त्याचा प्रभावी वापर करता आला पाहिजे. सिनेमा धोरण व इतर अनुषंगिक पायाभूत सुविधा सुधारल्यास चित्रपटसृष्टीला चालना मिळेल. जर खरोखर मराठी चित्रपटसृष्टी जगवायची असल्यास सर्वच पातळीवर गंभीरतेने काम करावे लागणार आहे. सर्वांनी मनापासून ठरवले तर मराठी चित्रपटांवरील संकटावर मात करता येऊ शकते. प्रामुख्याने सिनेमांची गुणवत्ता सुधारली तरच मराठी चित्रपटसृष्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे. मराठी चित्रपटांचे सीमोल्लंघन केवळ प्रतिकात्मक न राहता नव्या वाटचालींचे वास्तव ठरावे, हीच विजयादशमीच्या निमित्ताने अपेक्षा.