

पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी आणि महात्मा गांधी विचार संस्था पिंपरी महात्मा गांधी जयंती मोरवाडी येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. डॉक्टर मनीषा गरुड आणि माननीय जगन्नाथ आल्हाट यांनी महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. सर्वधर्म प्रार्थना घेण्यात आली. श्री ईश्वर सूर्यवंशी यांनी “साबरमती के संत तुने कर दिया कमाल” हे गीत सादर केले.

महात्मा गांधी विचार संस्था पिंपरी आणि ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी यांचे संस्थापक अध्यक्ष बी आर माडगूळकर कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले, “सध्या जगामध्ये इस्रायल, गाझा पट्टी, युक्रेन, रशिया इत्यादी ठिकाणी युद्ध चालू आहेत. त्यामुळे महात्मा गांधींच्या शांतता आणि अहिंसेच्या विचाराची जगाला अत्यंत गरज आहे. दोन जागतिक युद्ध होऊन सुद्धा जगाला शांतता आणि अहिंसेचे महत्त्व पटले नाही हे दुर्दैव आहे.”

डॉक्टर मनीषा गरुड आपल्या भाषणात म्हणाल्या, “आज महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, जागतिक अहिंसा दिन आणि विजयादशमी असा अपूर्व योग आला आहे. प्रकाशाने अंधारावर, ज्ञानाने अज्ञानावर आणि सत्याने असत्यावर विजय मिळवला पाहिजे. विजय मिळवला पाहिजे. ही खरी विजयादशमी.”

जगन्नाथ आल्हाट आपल्या भाषणात म्हणाले, “महात्मा गांधी हे एक अद्भुत रसायन होते. ते दिसायला अशक्त दिसत असले तरी त्यांचे मन खंबीर होते. त्यांनी आयुष्यभर सत्य अहिंसा आणि शांतता याचा विचारांचा प्रचार आणि प्रसार आणि कृती केली. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचा भारतीय लोकमानासावर प्रचंड प्रभाव होता, म्हणूनच लक्षावधी लोक महात्मा गांधींच्या मार्गाने चालत राहिले.”

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आपल्या भाषणात म्हणाले, “पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत अनेक राष्ट्र पुरुषांचे, महापुरुषांचा जयंती कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात साजरे होतात याबद्दल महानगरपालिकेचे हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे महात्मा गांधींचा जयंतीचा कार्यक्रम महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात साजरा करावी. असा आग्रह महापालिकेकडे आमचा होता. मात्र महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौ. सांडभोर मॅडम व उपायुक्त अण्णा बोदडे यांनी आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेची बॉडी आल्याशिवाय नवीन कार्यक्रम घेता येणार नाही. अशी उत्तर दिले. मागील तीन वर्षात प्रशासकीय राजवटीत अनेक धोरणात्मक निर्णय व हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करताना बॉडीची गरज आयुक्तांना लागत नाही.

मात्र राष्ट्रपिता गांधींच्या जयंती कार्यक्रमासाठी बॉडीचे कारण सांगितले जाते. हे अत्यंत निषेधार्य आहे. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी चिंचवड नगरी आज पर्यंत महानगरपालिकेने महात्मा गांधी जयंतीचा प्रबोधन कार्यक्रम होत नाही हे आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांचे व प्रशासनकर्त्यांच्या अपयश आहे याचा करावा तेवढा निषेध कमी आहे.पुढच्या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती व प्रबोधन पर्व हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले नाहीत तर त्यासाठी प्रसंगी आम्ही आंदोलन करू असा इशारा मारुती भापकर यांनी दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी श्री प्रफुल्ल पुराणिक आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी पुढील वर्षी महात्मा गांधी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

याप्रसंगी विल्यम साळवी यांनी सध्य परिस्थितीवर एक कविता सादर केली. ईश्वर अग्रवाल यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन केले. बी. आर. माडगूळकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार अरविंद देशपांडे यांनी मानले.