मोशी (Pclive7.com):- मोशी परिसरातील जाधववाडी, कुदळवाडी आणि चिखली बोऱ्हाडेवाडी भागातील विविध रस्त्यांच्या अपूर्ण कामांबाबत उपोषण सुरू करण्यात आले आहे. शिवसेना महिला शहर प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रूपाली आल्हाट यांच्यासह कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोशी परिसरातील २४ मीटर आणि १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांच्या प्रलंबित कामासाठी उपोषणाची वेळ आली असल्याचे रूपाली आल्हाट यांनी सांगितले. देहू-आळंदी रस्ता, शिवरस्ता लक्ष्मी चौक, आर. के. सोसायटी, श्रीराम चौक आणि जाधववाडी भागातील रस्ते व अंतर्गत मार्ग अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. चाकण, भोसरी आणि खेड-देहू-आळंदी कंपनीत काम करणारे तसेच पुण्याकडे जाणारे हजारो लोक दररोज या रस्त्यांचा वापर करतात. मात्र निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे या भागात मोठमोठे खड्डे, निर्माण झाले असून, नागरिकांना जीवन धोक्यात आणणारा प्रवास करावा लागतो. तसेच अनेक रस्त्यांचे काम अर्धवट असल्यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे.

या रस्त्यांच्या अपूर्ण कामावर लक्ष वेधण्यासाठी काही दिवसांपूर्वी रूपाली आल्हाट यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन आठ दिवसांच्या आत मोशीतील सर्व अपूर्ण रस्त्यांचे काम करण्याची मागणी केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आल्हाट उपोषण सुरू केले आहे.