सोसायटी फेडरेशन, स्वयंसेवी संस्था-संघटनांतर्फे नागरी सन्मान
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराने राजकारण कसे ‘ हँडल’ करायचे हे शिकवले. या भागात खूप वेगळ्या प्रकारची मते आहेत. मतभेद आहेत. परंतु, मनभेद नाहीत. शहर विकासासाठी सर्व मतप्रवाह एक होताना पाहिले आहेत. म्हणूनच “पब्लिक सर्विस” केंद्रबिंदू ठेवून काम केले. यासाठी कोणताही भेदभाव दाखविला नाही. स्वतंत्ररित्या प्रशासकीय अधिकारी म्हणून माझे काम चोख बजावले, अशा भावना पिंपरी-चिंचवडचे मावळते आयुक्त आणि नवनर्वाचित नाशिक कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केल्या.

सोसायटी फेडरेशन आणि विविध स्वयंसेवी संस्था- संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. चिंचवड येथील ऑटो कलस्टर मध्ये रविवारी (दि .12) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आरजे श्रृती यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
कार्यक्रमांमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे, संत साहित्याचे अभ्यासक तसेच संतपीठा संचालक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व शहरातील राजकीय, सामाजिक, आरोग्य, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे, सचिन लोंढे, सुधीर देशमुख, अविरत श्रमदानचे निलेश लोंढे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे दिपक करंदिकर, विकास डोळस, डॉ. सुहास कांबळे, प्रकाश जुंकटवार, सत्या त्रिपाठी, शिवलिंग ढवळेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, आराध्या कुलकर्णी या चिमुकल्या विद्यार्थिनीने ‘‘मला शेखर सिहांसारखे आयुक्त व्हायचेय..’’ अशा आशयाचे मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची दाद मिळवली.
मुलाखतीमध्ये बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये ‘कोलाब्रेट स्पिरिट’ खूप आहे. अनेक सेवा-संस्था या शहरासाठी अविरत झटताना दिसून येतात. सोसायटी फेडरेशन, विविध स्वयंसेवी संघटना शहर स्वच्छता, आरोग्य या मुद्द्यावर पुढे होऊन काम करत आहेत. याच माध्यमातून दिव्यांगांच्या विकासासाठी आपल्याला काम करता आले. या शहरातील लोकांनी आपल्याला भरपूर प्रेम दिले. त्यामुळे या शहरातून निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करणे हा माझ्यासाठी खूप भाऊ क्षण आहे.

तसेच, या शहराला राजकीय वारसा मोठा आहे. राजकारण कसे हँडल करावे या शहराने मला शिकवले. मात्र प्रशासकीय अधिकारी या नात्याने कोणताही भेदभाव न करता स्वतंत्रपणे , स्वतःच्या मतांनी शहराच्या विकासासाठी काम करायचे आहे. हेच तत्व मी जपले आणि यापुढेही आयुष्यभर हेच तत्व जपत राहणार आहे. माझ्या मनाला एखादी गोष्ट भिडली आणि ती समाज, शहर आणि नागरिकांसाठी महत्त्वाची आहे आणि तिचे दूरगामी परिणाम पुढील काळात दिसून येतील हे एकदा मनाशी पक्के केले तर मग ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असतो. हेच मी पिंपरी चिंचवड शहरासाठी केले.
एसटीपी प्लांट, नदी प्रदूषण, टाऊन प्लॅनिंग यांसारख्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये केल्या गेल्या आहेत. या अनुभवाचा चांगल्या प्रकारे वापर कुंभमेळ्यासाठी करता येणार आहे, असेही शेखर सिंह यांनी सांगितले.
शेखर सिंह झाले भावूक…
आयुक्त शेखर सिंह या कार्यक्रमात भावूक झालेले पाहायला मिळाले. पुढे ते म्हणाले ‘‘मी काय केले हे सांगत बसत नाही. शहराच्या विकासासाठी जे काही करता आले ते अतिशय चांगल्या प्रकारे केले. याचा परिणाम काही वेळा तात्काळ तर काही वेळा दूरगामी दिसून येईल. प्रशासक म्हणून काम करत असताना कोणासाठी कमी तर कोणासाठी जास्त केले असे काही वेळेला म्हटले गेले. मात्र वस्तुस्थिती तशी नाही पब्लिक सर्विस हा केंद्रबिंदू ठेवून काम केले आहे आणि ते शिस्तबद्ध करण्याचाच प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
समाविष्ट गावांचे काम कायम स्मरणात राहील – आमदार महेश लांडगे
आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले की, आयुक्त म्हणून आपली कारकीर्द पिंपरी-चिंचवड शहरासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. खंत एकाच गोष्टीची आहे की आपणाला व्यक्तिगत माझ्यामुळे काही गोष्टींमध्ये खूप टीका सहन करावी लागली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील 20 वर्षाचे नियोजन ठेवत आयुक्तांनी काम केले. विनाकारण वाद घालत त्यांनी वेळ घालवला नाही. 3 वर्ष 2 महिने आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत आपण काम केले. समाविष्ट गावांसाठी आपण केलेले काम उल्लेखनीय आहे. समाविष्ट गावांसाठी वाकडपासून चऱ्होली पर्यंत आपण केलेले काम या भागातील नागरिक हा कदपि विसरणार नाही, असेही आमदार लांडगे म्हणाले.
कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी बहारदार सादरीकरण केले. सूत्रसंचालन निवेदक भूषण करंदीकर यांनी केले. पसायदान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम…
यावेळी अतिरिक्त आयुक्त- 1 प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त-3 तृप्ती सांडभोर, क्रेडाईचे अरविंद जैन, बांधकाम क्षेत्रातील दिलीप पटेल, हॉटेल क्षेत्रातील उल्हास शेट्टी, सांगली कोल्हापूर सातारा मित्र परिवारचे सुनील जाधव, आण्णाभाऊ साठे संस्थेचे सांदीपान झोंबडे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समितीच्या वीना सोनवलकर, माता रमाई समितीचे निसर्गंध, वकील संघटना, सायकल मित्र संघटनेचे बापू शिंदे व सहकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी कुणाल साठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी प्रसाद वाईकर, अनुलोमचे शिरीष भालेकर, महावितरणचे सिंहाजी गायकवाड, अतुल देवकर यांच्यासह माजी सैनिक संघ, ज्येष्ठ नागरिक महासंघ, कामगार संघटना प्रतिनिधी, रिक्षा संघटना प्रतिनिधी, पीसीएमसी कर्मचारी महासंघ प्रतिनिधी, महिला बचतगट प्रतिनिधी, सिंधी समाजाचे प्रतिनिधी कुमार कातरिया, राजस्थानी समाजाचे बाबलू वर्मा, अग्रवाल समाजाचे विकास गरग, उत्तर भारतीय समाज संघाचे राजेंद्र सिंह, मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे विजय नाईक, इस्कॉनचे प्रशांत मोरे असे विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.