पिंपरी (Pclive7.com):- चिखली-कुदळवाडीतील संशयास्पद ठरलेली कारवाई, वाकडच्या टीडीआर घोटाळ्यातील तोडपाणी, विकास आराखड्यातील आतबट्ट्याचे व्यवहार, कोट्यवधींच्या मोडलेल्या ठेवी, संशयास्पद निविदा, विकासकामांचे वाटप होताना ठरवून होणारी रिंग, सुशोभीकरणाच्या नावाखाली धंदेवाईकपणा अशा गैरप्रकारांची तथा घोटाळ्यांची टीका पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर सर्वच स्तरातून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांची बदली होण्यापूर्वी एक महिन्यात त्यांनी मंजूर केलेली भांडवली कामे आणि टेंडरची सर्व माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मागवली आहे.

तुषार कामठे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाकडून माहिती अधिकारांच्या अंतर्गत पत्र दिले आहे. यात त्यांनी सर्व माहिती लेखी स्वरूपात मागवली आहे.

तुषार कामठे यांनी म्हटले आहे की, ०१) मा. आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व ३० दिवसांत (दिनांक १ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांनी मंजूर केलेल्या सर्व भांडवली कामांची यादी, ज्यामध्ये विभागाचे नाव, कामाचे नाव, अंदाजपत्रक रक्कम व मंजुरी दिनांक नमूद असावा. २) त्याच कालावधीत मंजूर झालेल्या सर्व टेंडरची माहिती कामाचे नाव, अंदाजपत्रक रक्कम, मंजूर कंत्राटदाराचे नाव, निविदा क्रमांक, मंजुरी दिनांक व विभागाचे नाव. ३) या कालावधीत तातडीने मंजूर केलेली किंवा विशेष आदेशाने मंजूर केलेली कामे असल्यास त्यांचा स्वतंत्र तपशील द्यावा. ४) १ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत दिलेल्या सर्व टिडिराच्या फाईलचा तपशील द्यावा. ५) ही सदर माहिती PDF/Soft Copy स्वरूपात ई-मेलद्वारे किंवा छापील स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी तुषार कामठे यांनी केली आहे.