
पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप आणि रिबप्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) सोबत लढणार आहेत. मात्र, प्रभागामध्ये मतदारसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते तसेच चिन्ह पोहचवताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे भाजपच्या पक्षचिन्हावर आरपीआय महापालिकेच्या जागा लढणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी भाजपाकडे १५ जागांची मागणी केली असल्याचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी बुधवारी (दि.२६) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कुणाल वाव्हळकर म्हणाले, युतीसंदर्भात भाजपाने प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याकडे आम्ही १५ जागांची मागणी केली आहे. अनूसुचित जातीची लोकसंख्या ज्या प्रभागात जास्त आहे त्या प्रभागांमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहे. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची संख्या जास्त आहे. मागच्या निवडणुकीत आम्हाला तीन जागा देण्यात आल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभेला देखील आम्हाला न्याय मिळाला नाही.

भाजपसाठी प्रत्येक प्रभागात आरपीआयचा कार्यकर्ता काम करत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला न्याय मिळेल. भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आमचा समन्वय आहे. आरपीआयचे तुल्यबळ उमेदवार आम्ही उतरवणार आहोत. तसेच त्यांच्याकडून देखील महायुतीचे पालन केले जात आहे. त्यामुळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यांनी १०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे, तो आम्हाला गृहीत धरूनच केला असल्याचे वाव्हळकर यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले यांची विजयी संकल्प यात्रा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय पक्षाचे सर्वे सर्वा रामदास आठवले शनिवारी (दि.२९) शहरात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये विजयी संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी मतदारांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
पिंपरी प्रभागातील जागेवर आरपीआयचा दावा..
गेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी प्रभागातून आरपीआयच्या मोनिका सुरेश निकाळजे यांना चांगले मतदान झाले होते. ही जागा आरपीआयचीच आहे, ती जागा आरपीआयलाच सुटणार आहे. आम्ही शहरातील काही प्रमुख जागांवर आग्रही आहोत त्यातील पिंपरी प्रभागातील जागा सुद्धा आहे, असा दावा शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केला आहे.























Join Our Whatsapp Group