पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादी २०२५ मधील मोठ्या प्रमाणातील त्रुटी, विसंगती आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा गंभीर पद्धतीने घेत, पिंपरी–चिंचवड भाजपकडून आज राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी संपूर्ण शहराच्या वतीने हे निवेदन सादर करत, मतदार यादीतील गोंधळ तात्काळ दूर करण्याची मागणी केली.

शत्रुघ्न काटे यांनी निवेदनात नमूद केले की, प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जाणे, चुकीच्या प्रभागात स्थलांतरित होणे, दुबार नोंदी, पत्त्यातील त्रुटी तसेच यादी पाहण्यासाठी नागरिकांना कोणतीही प्रभावी डिजिटल सुविधा उपलब्ध नसणे—या सर्व गोष्टींमुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, “लोकशाहीचा मूलभूत हक्क म्हणजे नागरिकांचा मतदानाचा हक्क. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेने अशा त्रुटींकडे विशेष लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.”

याच अनुषंगाने, शत्रुघ्न काटे यांनी मतदारांना योग्य संधी मिळावी यासाठी हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत किमान 10 दिवसांनी वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच, नागरिकांना सोयीस्कर व्हावे म्हणून विशेष हेल्पडेस्क, ऑनलाइन शोध सुविधा आणि सहाय्य केंद्र तत्काळ सुरू करण्याची विनंती आयोगाला करण्यात आली आहे.

भाजप शहराध्यक्षांनी स्पष्ट केले की, “अचूक मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेची पायाभरणी असते. चुकीची, अपूर्ण किंवा गोंधळाची यादी नागरिकांवर अन्याय करणारी ठरते. त्यामुळे पिंपरी–चिंचवड शहरातील सर्व नागरिकांचा न्याय आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने तात्काळ पावले उचलली पाहिजेत.”
शहरातील विविध भागांतून येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन महत्त्वाचे मानले जात असून आगामी निवडणूक प्रक्रियेतील शुचिता आणि विश्वासार्हतेसाठी आयोगाने कोणती भूमिका घेतली जाते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
Tags: Shatrugguna Kate























Join Our Whatsapp Group