पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन ची मार्गिका क्र.१ पीसीएमसी ते स्वारगेट आणि मार्गिका क्र.२ वनाज ते रामवाडी साठी दोन क्यूआरटी टीम महामेट्रोने तयार केल्या आहेत. महामेट्रोचे काम मार्गिका क्र.१ व मार्गिका क्र.२ येथे जलद गतीने सुरु असून नागरिक, पादचारी, वाहनचालक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरक्षित रहावी यासाठी महामेट्रोतर्फे जलद कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे जलद कृती दल मार्गिका क्र.१ चे दि.१५ डिसेंबर २०१७ आणि मार्गिका क्र.२ चे दि. २७ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यरत आहेत.
हे जलद कृती दल तीन शिफ्टमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत तसेच तिसरी शिफ्ट ही रात्री ११ पासून ते दुसरे दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत काम करत असते. या दलामध्ये एका शिफ्टमध्ये १ जेसीओ (सुभेदार) व २ एनसीओ व एक चालक असे कर्मचारी कार्यरत अाहेत. हे कर्मचारी लाइट क्रीम कलरचे डांगरी व त्यावर काळा पट्टा तसेच डोक्यावर महामेट्रोच लोगो असलेली क्रीम व ऑरेंज रंगाची टोपी व पायात ऑम्युनेशन बुट अश्या गणवेशात असतात. जलद कृती दल हे नेहमी सहयोग केंद्राच्या संपर्कात असते. मार्गिका क्र.१ च्या सहयोग केंद्राचा टोल फ्री. नंबर १८००२७०५५०१ असा आहे तर मार्गिका क्र.२ च्या सहयोग केंद्रचा टोल फ्री नंबर ८६६९६२७०३३ हा आहे.
या जलद कृती दलामध्ये वाहन बहुरंगी रंगामध्ये आहे. (निळा, हिरवा, जांभळा, नारंगी) व त्यावर महामेट्रोचा लोगो व वाहनाच्या दोन्ही बाजूस क्विक रिस्पॉन्स टीम असे इंग्लिश मध्ये लिहिलेले अाहे. गाडीच्या टॉप वरती नारंगी (अंबर) रंगाचे दोन पांढरे रंगाचे दिवे बसविण्यात आलेले आहेत.
सदर वाहनात : १)प्रथमपोचार पेटी, २)स्ट्रेचर, ३)फायर एकत्रित व्हिशर, ४)सर्च लाइट, ५)काठी, ६)लाइट बॅटन, ७)लाल व हिरवे रंगाचे झेंडे, ८)कौशन टेप, ९)नायलॉन दोर सह,१०)सायरन, ११)ऍम्प्लिफायर इत्यादी साधनांसह कार्यस्थ आहे.
जलद कृती दलाची कर्तव्ये :
१) वाहतूक सुरळीत व व्यवस्थित ठेवणे.
२) गर्दीवर नियंत्रण ठेवणे.
३) अपघातांचा संदेश मिळताच त्वरित घटनास्थळ रहदारी नियंत्रित ठेवणे. प्रथमपोचार करून ठरवून दिलेल्या दवाखान्यात दाखल करणे, त्यांच्या नातेवाईकास व पोलिसांना अपघाताची माहिती कळविणे. तसेच सहयोग केंद्रास माहिती देणे.
४) अपघातास कारणीभूत परिस्थिती उद्भवल्यास (रोड वर झाड पडणे, मोठा खड्डा पडणे, ऑइल सांडणे इत्यादी) याबाबतची माहिती संबंधित यंत्रणेला कळवून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे.
५) आपत्कालीन परिस्थितीत कामाच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीस मज्जाव करणे.
६) अपघातात मृत झालेल्या व्यक्तीस त्वरित सरकारी दवाखान्यात हलविणे.
७) वाहतूक बदलाबाबत व वाहन तळाबाबत मेगा फोन द्वारे नागरिकांना सूचना देणे.
८) वृद्ध, अपंग, अंध व लहान मुले रस्ता ओलांडण्यास मदत करणे.
९) जलद कृती दलाची वेळोवेळी मॉक ड्रिल होऊन त्याची कार्यक्षमता आजमावीने तसेच त्यात सुधारणा करत राहणे.
या वर्षी २०१८ मध्ये महाराष्ट्र बंद, होळी, मा. उपराष्ट्रपती यांचा पुणे दौरा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्री.जगदगुरू तुकाराम महाराज पालखी वेळी मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. २०१७ ते आजपर्यंत ज्या ठिकाणी अपघात घडला असेल किंवा मेट्रो कामाचे ठिकाणी किरकोळ अपघात आहेत व सर्व जखमींना त्वरित क्यूआरटीच्या वाहनातून दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.