पिंपरी (Pclive7.com):- बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुसगाव येथे भरधाव आरएमसी ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंजली शंकर साळवे असे मृत तरुणीचे नाव असून हा भीषण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस–नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आरएमसी ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे अंजली रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक चालक राजपाल कसबे याला अटक केली आहे. तसेच सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी सूर्या कन्स्ट्रक्शनचे मालक गणेश कलशेट्टी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे सुसगाव परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून जड वाहनांच्या बेदरकार वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



















Join Our Whatsapp Group