पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील आऊटसोर्सिंग पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन थकविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत पशुरुग्णालय, प्राणीसंग्रहालय तसेच विविध प्रक्षेत्रांमध्ये कामकाजासाठी मे. साई एजन्सी या ठेकेदारामार्फत पशुशल्यचिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्यूरेटर तसेच इतर पैरावेट स्टाफ आणि कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने कार्यरत कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन दिले नसल्याची तक्रार समोर आली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे संदीप वाघेरे यांनी नमूद केले आहे.
तसेच संबंधित एजन्सीकडून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) तसेच इतर कागदपत्रांबाबत खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती सादर करून विभागाकडून बिले उचलल्याचा गंभीर प्रकार घडल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चौकशीअंती मे. साई एजन्सी दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. कामगारांवर अन्याय होऊ नये यासाठी महानगरपालिकेने तातडीने योग्य ती कारवाई करावी, असेही संदीप वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे.



















Join Our Whatsapp Group