अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथे एका व्यापाऱ्याचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने तब्बल १०० किलोमीटर पाठलाग करत संगमनेर येथे पाच आरोपींना अटक करून अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी (वय ४७) हे रहाटणीतील शिवराजनगर परिसरात राहणारे व्यावसायिक आहेत. रविवारी (९ मार्च) सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलच्या समोरून जात असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्यांचे अपहरण केले.
या घटनेनंतर काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपींचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सुमारे १०० किलोमीटर पाठलाग करत संगमनेर परिसरात आरोपींना गाठत त्यांना ताब्यात घेतले आणि व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली.
दरम्यान, अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे मूळचे बिहार राज्यातील असून अपहरण करण्याच्या उद्देशाने ते पिंपरी-चिंचवड शहरात आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



















Join Our Whatsapp Group