– बाळासाहेब जवळकर –
पिपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वजनिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बदनामी नेहमीच होत असते. कारण, ठराविक कालावधीनंतर तशी प्रकरणेच चव्हाट्यावर येतात. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील अपहार हे असेच प्रकरण आहे. ज्याद्वारे पालिकेच्या बदनामीचे सत्र कायम असल्याचे दिसून आले. नाट्यगृहाचे भाडे व अनामत रक्कम वसुलीत ५० लाख ७० हजारांचा अपहार झाल्याचे हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतरच्या घडामोडीत नाट्यगृहाशी संबंधित १६ जणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन काळात विधानसभेत दिली. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नाट्यगृह भाड्याने देताना येथील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आमदार जगताप यांनी निदर्शनास आणून दिले.

नाट्यगृहातील कार्यक्रमांचा हिशेबच ठेवण्यात आला नाही. जमा झालेली रक्कम स्वतःच्या खिशात घालण्यात आली. वेळेत धनादेश सादर करण्यात आले नाही, पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अनेक बाबी या प्रकरणाने चव्हाट्यावर आल्या. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
नाट्यगृहातील अपहार हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सगळे घडल्याचे सांगत आमदार जगतापांनी, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची तसेच अपहाराची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे. कोणतीही चालढकल न करता तातडीने ही कारवाई झाली पाहिजे.
चिंचवड नाट्यगृहाला सर्वाधिक पसंती..
नाटक कंपन्यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या अनेक संस्था, संघटना, शाळांना त्यांच्या कार्यक्रमांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधांयुक्त मध्यवर्ती, सोयीचे ठिकाण असल्यामुळे चिंचवड नाट्यगृहाला सर्वाधिक पसंती आहे. उत्तम स्वच्छता राखणाऱ्या या नाट्यगृहात विविध क्षेत्रातील अतिमहत्वाच्या व्यक्तींचे कार्यक्रम नियमितपणे होत असतात. म्हणूनच ‘बालगंधर्व’ पाठोपाठ चिंचवड नाट्यगृहाला सर्वांची मागणी असते. परंतू, एखाद्या चांगल्या गोष्टीची माती करायची, ही पालिकेच्या अधिकाऱ्यांची जुनी खोड आहे. त्याची प्रचिती चिंचवड नाट्यगृहाच्या कारभारातून वेळोवेळी आलेली आहे. आजही तोच अध्याय सुरू आहे.
तारखा वाटपात कमिशन धंदा?
चिंचवड नाट्यगृहात सगळ्यात मोठा घोटाळा कशात असेल, तर तो तारखा वाटपांमध्ये आहे. कशापध्दतीने तारखांचे वाटप झाले पाहिजे, याचे रीतसर नियम असताना ते पायदळी तुडवून तारखा विकण्याचा धंदा होतो, असा दाट संशय व्यक्त केला जातो. ठराविक लोकांनाच मोक्याच्या आणि ढीगभर तारखा कशा मिळू शकतात? चांगल्या तारखा विशेषत सुट्टीच्या दिवसांच्या तारखांसाठी भरपूर पैसे मोजावे लागतात का? शहरातील उपक्रमशील संस्थांना, खऱ्या गरजवंतांना तारखा मिळतच नाही. त्यामागचे गौडबंगाल काय आहे. तारखांचे वाटप ऑनलाईन पध्दतीने होते, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात तो खोटा असून मूर्खात काढण्याचा प्रकार आहे.
गेल्या काही महिन्यांमधील नाट्यगृहातील तारखांचे वाटप पूर्णपणे संशयास्पद आहे. नाट्यगृहाबाहेरील व्यक्ती तारखांच्या वाटपात दलाली करताना दिसतात. मोठ्या नेत्यांची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पुढे करून, ‘साहेबांना’ पैसे पोचवावे लागतात, असे सांगून ही वसुली केली जाते आणि आयोजकांना वेठीस धरले जाते, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जातात. नाट्यगृहात असा भुरटेपणा करणारे कोण आहेत, त्यांचे ‘साहेब’ कोण आहेत, खरेच त्यांचा संबंध आहे का? की कथित साहेबांच्या नावाखाली लूटमार केली जाते, हे यानिमित्ताने स्पष्ट होणे आवश्यक आहे.
सिने नाट्य क्षेत्रातील प्रेक्षकप्रिय कलाकारांच्या नाटकांच्या तारखा परस्पर काढून घेण्याचा करंटेपणा अनेकदा घडलेला आहे. तिकीट बुकींगचे पैसे परत देण्याची वेळ कलाकारांवर आलेली आहे. चांगले कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की कित्येक आयोजकांवर ओढावलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिंचवड नाट्यगृहात कार्यक्रमांसाठी लागणारे एलईडी, साऊंड सिस्टीम, लाईट, माईक यासारखे साहित्य बाहेरून घेण्यासाठी दबाव टाकला जातो. नाट्यगृहातील अधिकाऱ्यांशी सेटिंग असणाऱ्यांकडूनच ते साहित्य घेतले पाहिजे, असे अलिखित नियम करण्यात आलेला आहे. त्यासाठी दुप्पट-तिप्पट रक्कम द्यावी लागते. त्याचा नाहक भुर्दंड आयोजकांना सोसावा लागतो. नकार दिल्यास कार्यक्रमासाठी तारखा दिल्या जात नाहीत, इतर अडचणी निर्माण केल्या जातात. केवळ कमिशनच्या धंद्यासाठी कित्येकांना त्रास दिला जातो. अशाच त्रासातून अलिकडेच पिंपळे सौदागरच्या एका शालेय संस्थेने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर रवी लांडगे यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रारही केली होती.
सरसकट सगळेच कर्मचारी नाट्यगृहातील चुकीच्या कामकाजात सहभागी नाहीत. काही कर्मचारी चांगले आणि नियमानुसार काम करणारे आहेत. मात्र, त्यांना दमात घेतले जाते. वरिष्ठांना सांगून कारवाई करू, अशी भीती घातली जाते. गेल्या काही दिवसांत नाट्यगृहाच्या कामकाजाची चांगल्या प्रकारे माहिती असणारे अनेक कर्मचारी नाट्यगृहाबाहेर घालवून देण्यात आले. तोडपाणीच्या दृष्टीने सोयीचे आणण्यात आले. नाट्यगृहातील अशा उद्योगांची माहिती विविध मार्गांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत असतानाही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. आर्थिक लागेबांधे आणि वरकमाईचा हिस्सा हेच त्यामागचे कारण असू शकते.
तक्रारींचा पाऊस, अक्षम्य दुर्लक्ष..
नाट्यगृहातील मूलभूत सुविधांचीही दयनीय अवस्था आहे. वायफाय सुविधा कागदावरच आहे. अनेक खुर्च्या नादुरूस्त आहेत. स्टेजच्या फळ्या उखडलेल्या आहेत. स्टेजवर जागोजागी डाग पडलेले आहेत, त्यावर चिकटपट्ट्या लावल्याने व्यासपीठ घाणेरडे वाटते. स्टेजवर लेवलसाठी वापरले जाणारे लाकडी बॉक्स मोडकळीस आले आहेत. कलाकारांना बसून जेवता येईल, अशी व्यवस्थाच नाही. ते उभे राहूनच जेवण करतात. व्हीआयपी कक्षाची चावी मागणी करूनही कलाकारांना उपलब्ध करून दिली जात नाही. चार मेकअप रूम आहेत. तेथे सुविधांचा अभाव आहे आणि एसी यंत्रणा देखील नाही. डोअर कीपर नाही. प्रेक्षकांना बसवण्यासाठी कर्मचारी नाहीत. कॅन्टीनवाल्याची लुबाडणूक होते. नाट्यगृहात सर्रास मटनाच्या, दारूच्या पार्ट्या होतात.
चिंचवड नाट्यगृहातील या अनागोंदी कारभाराकडे कोणाचेही लक्ष नाही आणि नियंत्रण तर त्याहून नाही. म्हणूनच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अलिकडे काही दिवसांपासून तर ‘नको ते’ प्रकार सुरू आहेत. एक जानेवारीपासून अगदी काल-परवा पर्यंतचे नाट्यगृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास आणि कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक जाबजबाब घेतल्यास येथील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.
चिंचवड नाट्यगृह म्हणजे कोणाची जहागिरी नाही. संगनमताने चालणारे लूटमार केंद्रही नाही. शहराच्या सांस्कृतिक ओळखीचे ते प्रतीक आहे. अनेक कलाकार, संस्था आणि रसिकांच्या योगदानातून नाट्यगृहाने राज्यभर नावलौकिक मिळवला आहे. परंतू, धंदेवाईक वृत्तीच्या नालायकांमुळे कला आणि संस्कृतीचे मंदिररूपी वास्तूची प्रतिमा मलिन झाली आहे. पर्यायाने, पिंपरी पालिकेची देखील यथेच्छ बदनामी झाली.
पुन्हा एकदा राज्यव्यापी बदनामी करून घ्यायची नसल्यास आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर रवी लांडगे यांच्यासह समस्त कारभाऱ्यांनी, विश्वस्तांनी नाट्यगृहातील ‘उद्योगांकडे’ आणि कमिशन ‘धंद्यांकडे’ वेळीच लक्ष दिले पाहिजे. तेथे चाप लावला पाहिजे. कुंपणच शेत खात असल्याने “खरे चोर” पकडून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा, भविष्यात आणखी असेच एखादे प्रकरण बाहेर येऊन पिंपरी-चिंचवडच्या बदनामीचे सत्र सुरूच राहील, असे दिसते.
लौकिकप्राप्तीसाठी अनेकांचे परिश्रम..
काही वर्षांपूर्वी शशीकांत बोधनी नावाचे चांगले अधिकारी चिंचवड नाट्यगृहाला लाभले होते. ते स्वत: सगळीकडे लक्ष ठेवायचे. सर्वांशी सलोख्याने वागायचे. नम्रतेने बोलायचे. कलावंत असो की कर्मचारी उत्तम संवाद ठेवायचे. म्हणूनच ते सेवानिवृत्त झाले, तेव्हा पालिकेने त्यांना मानधनावर नियुक्त करून आणखी दोन वर्षे सेवेची संधी दिली. असा अधिकारी नाट्यगृहाच्या नशिबी पुन्हा कधीच आला नाही. काही प्रमाणात तुकाराम जाधव, अविनाश जाधव आदींनी शक्य तितके चांगले काम करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. प्रमोद सावरकर यांनी अल्प कालावधीत पालिकेला भरघोस उत्पन्न मिळवून दिले. अजूनही चिंचवड नाट्यगृहाचे राज्यभर नाव आहे, त्यामागे अनेकांचे परिश्रम आहेत. मात्र, काही नासक्या कांद्यांमुळे वखारीवरच आफत आली आहे. अपहार प्रकरणात गव्हासोबत किडे रगडले गेले. खरे दोषी नामानिराळे राहिले. कोणी वालीच नाही, तो बळीचा बकरा ठरला..!
Tags: #MaheshlandgeCMDevendraFadnavisdcmeknathpankajpatilPCMCPCMCCORPORATIONRamkrishna More NatyagruhaRaviLandgeshankarjagtapshrawanhardikarsunetrapawar



















Join Our Whatsapp Group