पिंपरी (Pclive7.com):- आजच्या पिढीवर दिवसेंदिवस पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे. भारतीय संस्कृतिशी निगडीत असलेल्या कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी आदी सांस्कृतिक नृत्याची नावे सुद्धा नलीन पिढीला माहित नाहीत. सांस्कृतिक नृत्य कले विषयी गोडी निर्माण होण्यासाठी “नृत्यअविष्कार” सारख्या कार्यक्रमाची खूप आवश्यकता असून सांस्कृतिक ‘नृत्यकला’ टिकून असल्याचे मत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
सांगवी येथील निळू फुले रंगमंदिर येथे शनिवारी “नृत्यअविष्कार २०१८” या कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांनी या “नृत्यअविष्कार २०१८” कथ्थक नृत्य कार्यक्रम आयोजनाचे प्रशंसा करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. शत्रुघ्न काटे म्हणाले की “आज जणू नागरिकांना भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या नृत्य कलेचा विसरच पडला आहे. आजच्या पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा एवढा प्रबळ प्रभाव आहे कि, भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी आदी सांस्कृतिक नृत्यकलेची तर नाव सुद्धा माहित नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये सांस्कृतिक नृत्य विषयी गोडी निर्माण होण्यासाठी “नृत्यअविष्कार” सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे”.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संजय भिसे व कुंदाताई भिसे, पी. के.इंटरनॅशनल स्कुल चेअरमन जगन्नाथ काटे, शर्मिला मजुंदार, पी. के. इंटरनॅशनल स्कुल प्राचार्या दिपाली जुगुळकर, अविनाश कामटीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रिया बिरारी व शिल्पी बॅनर्जी यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत कथ्थक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील व सागर बिरारी यांनी केले.