पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली ठेकेदाराला लाखों रूपये अदा केल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरात शहरातील १४ हजार कुत्र्यांची नसबंदी केली असून त्यासाठी संबंधित ठेकेदाराला तब्बल ३८ लाख रूपये अदा केले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान त्या ठेकेदाराला कुत्र्यांच्या नसबंदीसाठीचे १५ लाखांचे बिल देखील देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली आहे.
आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची नसबंदी करण्याच्या कामास मुदतवाढ देण्याचा विषय स्थायीसमोर होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सुमारे २५ हजार कुत्री असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, एक वर्षात शहरातील १४ हजार कुत्र्यांची संबंधित ठेकेदाराने नसबंदी करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडले आहे. मात्र, त्या परिसरात वर्षभरात कुत्र्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. या संदर्भात कुत्री पकडणाऱ्या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत महापालिकेने या ठेकेदाराला ३८ लाख रुपये अदा केले आहेत. अद्यापही १५ लाख रुपये देणे बाकी आहे. तर तीन महिन्यांच्या कालावधीत ३ हजार ६०० कुत्री पकडून त्यांची नसबंदी केली जाणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी महापालिकेला आणखी २४ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक दररोज जखमी होत आहेत. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग नेमका करतोय तरी काय? असा प्रश्न उपस्थित रहात आहे. अशा परिस्थितीत कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली महापालिका लाखो रूपयांची उधळपट्टी करत असल्याचे चित्र आहे.
























Join Our Whatsapp Group