भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांची वाढती लोकप्रियता व वाढता जनाधार पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे विलास लांडे यांना बदनाम करण्यासाठी विरोधक जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरत आहेत, असा आरोप निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोखंडे यांनी केला आहे.
यासंदर्भात लोखंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासनाला हाताळण्याचे वकुब हे माजी आमदार विलास लांडे यांच्या आत्तापर्यंतचा कार्यशैलीतून पिंपरी-चिंचवड शहराने पाहिले आहे. लांडे यांच्या रूपाने भोसरी विधानसभा मतदारसंघाला सर्वसमावेशक द्रष्टा नेता लाभलेला आहे. उत्तम प्रशासक म्हणून देखील विलास लांडे यांची ओळख आहे. ते भोसरी मतदारसंघात जनसामान्यांच्या आणि सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत सर्वसामान्यांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ आणि चलती वाढली आहे. आपली वार्ता क्षणात दुसर्याकडे पोहोचण्यासाठी एक मजबूत माध्यम म्हणून सोशल मीडिया समोर आला आहे. त्याचा वापर करून विरोधक विलास लांडे यांच्या बदनामीचा डाव आखत आहेत. विलास लांडे यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी लांडे भोसरी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
विरोधकांकडून विलास लांडे यांना बदनाम करण्यासाठी विवीध क्लृप्त्या शोघल्या जात आहेत. विरोधक रडीचा डाव खेळत आहे. विरोधकांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जर विकासकामे केली असती तर त्यांना बोगस बातम्या अथवा बनावट पोस्टचा आधारच घ्यावा लागला नसता. विलास लांडे यांचा विजरथ आता जनता जनार्दनाच्या साथीने सुसाट निघाला आहे. या विजयरथाला रोखने विरोधकांना खडतर ठरत आहे. त्यामुळेच विरोधकांनी लांडे यांच्या बदनामीच डाव आखल्याचा आरोप विष्णू लोखंडे यांनी केला आहे.”






















Join Our Whatsapp Group