पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटी पार्क मधील एका चांगल्या हॉटेल मधील लेडीज वॉशरूम मध्ये मोबाईलमधील कॅमेरामधून चित्रीकरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी हॉटेलचे कर्मचारी राकेश शेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. तर कर्मचारी राम देब नाथ (२४, रा. हिंजवडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी आयटी पार्क मध्ये लक्ष्मी चौक ते फेज तीनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बी हाईव्ह नावाचे हॉटेल आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हॉटेल मधील लेडीज वॉशरूम मध्ये नाथ याने त्याचा मोबाईल ठेवला. मोबाईल मधील कॅमेरा ऑन ठेवून महिलांचे चित्रीकरण केले. याबाबत ग्राहकांनी वेगवेगळ्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती टाकली. तसेच कमेंट दिल्या. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस मोबाईल ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात मोठ्या संख्येने मुली, महिला नोकरीच्या निमित्ताने दररोज जात असतात. या घटनेमुळे येथील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंजवडी परिसरातील सर्वच हॉटेल, मॉलमधील वॉशरूम, चेंजिंगरूम याची पोलीसांनी कसून तपासणी करावी अशी मागणी होत आहे.






















Join Our Whatsapp Group