पिंपरी (Pclive7.com):- राहुल गांधी हे हायब्रीड व्हर्जन आहेत. इंडो-इटलियन व्हर्जन असल्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीच माहिती नाही. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशा पद्धतीने वक्तव्य केले असल्याची बोचरी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या संघनात्मक निवडणुकीसाठी ते आज शहरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राम शिंदे म्हणाले की, राहुल गांधी ‘हायब्रीड व्हर्जन’ आहेत. इंडो-इटलियन व्हर्जन असल्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीच माहिती नाही. त्यांना सावरकर काय आहेत हे कसे कळणार, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. ज्यांनी आपला देह देशासाठी झिजवला. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा राष्ट्रपुरूषाविषयी, स्वातंत्र्य सैनिकाविषयी बोलणे म्हणजे अत्यंत गैर आहे. हे ‘हायब्रीड व्हर्जन आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून असं वक्तव्य झाले असल्याची बोचरी टीका शिंदे यांनी यावेळी केली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यामुळे पक्षाचे नुकसान झाले यावर मी ठाम असल्याचा शिंदे यांनी पुनरुच्चार केला. नगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांचे थेट म्हणणे जाणून घेण्यासाठी अशिष शेलार आले होते त्यावेळी हे मत व्यक्त केले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नगरमध्ये १२-० असे करू म्हटले होते. परंतु १२-० झाले नाही. तर पूर्वी ५ जागा भाजपाच्या होत्या, त्यातील ४ जण पडले. जिल्ह्यात पाच वरून आमदारांची संख्या तीनवर आली. आणि म्हणूनच त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर फायदा होण्याऐवजी पक्षाला तोटा झाला असल्याच्या या मतावर मी आजही ठाम आहे. त्यांची कुठलीही ताकत, शक्ती भाजपच्या उपयोगात आली नाही असेही ते शेवटी म्हणाले.