पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या तरूणाच्या खून प्रकरणात काही समाजकंटक जाणिवपूर्वक जातीय तेढ निर्माण करत आहेत. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करत असून त्यांच्यावर पोलीसांची करडी नजर आहे. या प्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट तसेच अफवा प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून शहरात सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखणेबाबत आवाहन पोलीसांनी केले आहे.
पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या तरूणाच्या खून रविवारी दि.०७ रोजी खून झाला होता. या घटनेनंतर ६ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या गुन्ह्याचा तांत्रिक व शास्त्रोक्त पध्दतीने सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव करीत आहेत. मात्र या प्रकरणास काही समाजकंटक जाणिवपुर्वक जातीय सलोखा बिघडविण्याकरीता, खोडसाळपणे प्रक्षोभक, आक्षेपार्ह, चिथावणीखोर पोस्ट व्हॉट्सअॅप , फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, हॅलो, टेलीग्राम व टिकटॉक व्हिडीओ अशा सोशल मिडीयातुन प्रसारित करत आहेत. अशा सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट्स, संदेश तसेच अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवुन त्यांना बळी पडु नये. अशा स्वरुपाच्या पोस्ट्स टाकणारे व प्रसारित करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडुन बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. सोशल मिडीयावरुन आक्षेपार्ह पोस्ट्स व संदेश प्रसारीत करणाऱ्यांवर विरुद्ध प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कोविड -१९ प्रादुर्भाव प्रतिबंध अनुषंगाने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची सामाजिक, जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील यादृष्टीने सर्वानी दक्षता घेवुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group