पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटी पार्क परिसरात सुरक्षा यंत्रणांची सज्जता, समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद क्षमता तपासण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) आणि युनायटेड स्टेट्स आर्मीच्या सैनिकांनी संयुक्तपणे भव्य मॉक ड्रिलचे आयोजन केले. या सरावाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

बुधवारी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत तब्बल पाच तास चाललेल्या या सरावात १०० हून अधिक एनएसजी कमांडोज, अमेरिकन सैन्याचे १७ जवान, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी सहभाग घेतला.
माण-हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीच्या आवारात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज कमांडोज, लष्करी वाहनांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था पाहून स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ उत्सुकतेसोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा पूर्वनियोजित सुरक्षा सराव असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

संभाव्य दहशतवादी हल्ला, ओलीस संकट किंवा इतर गंभीर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय साधून तातडीने कारवाई कशी करायची, नागरिकांची सुरक्षित सुटका कशी करायची आणि परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे याची प्रत्यक्ष चाचणी या मॉक ड्रिलद्वारे घेण्यात आली.
या संयुक्त सरावामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, भविष्यातील कोणत्याही सुरक्षाविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी यंत्रणांची तयारी अधिक सक्षम होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



















Join Our Whatsapp Group