पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “सुनेत्रा वहिनी गुंगी नहीं, आंधी है” अशा घोषणा देत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, “महिलांचा अपमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीने माफी मागावी. अन्यथा राज्यातील महिला त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवतील,” असा इशारा दिला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ घोषणाबाजी सुरू असून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.




















Join Our Whatsapp Group