पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरात एका दुचाकीत बिनविषारी तस्कर जातीचा साप आढळून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र सर्पमित्र जयवर्धन कांबळे यांनी तत्परता दाखवत सापाचे सुरक्षित रेस्क्यू केल्याने संभाव्य अनर्थ टळला.

दापोडी येथील आराध्य ढोल-ताशा पथकाच्या सरावाच्या ठिकाणी उभी असलेल्या एका दुचाकीमध्ये साप दडून बसल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आले. गाडीच्या भागात हालचाल दिसताच त्यांनी तातडीने सर्पमित्र जयवर्धन कांबळे यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सावधगिरी बाळगत दुचाकीच्या आतील भागातून बिनविषारी तस्कर सापाला बाहेर काढले. रेस्क्यूदरम्यान सापाला कोणतीही इजा झाली नाही. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांसह विविध सरपटणारे प्राणी आसऱ्याच्या शोधात वाहनांमध्ये, चप्पल-बुटांमध्ये किंवा अडगळीच्या ठिकाणी लपण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहन सुरू करण्यापूर्वी तसेच चप्पल-बूट वापरण्यापूर्वी त्यांची काळजीपूर्वक पाहणी करावी, असे आवाहन सर्पमित्र जयवर्धन कांबळे यांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group