पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची वैयक्तिक लक्ष शहरात घालण्यास सुरूवात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामान्य पदाधिकारी पर्यंत सर्वांशी थेट संपर्क करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योजना आखली आहे.
यात त्याचे स्वीय सहाय्यक दर सोमवारी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यातील सर्व माहिती थेट अजितदादांच्या पर्यंत पोहोचविणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडकरांना राज्य सरकारशी संबंधित कामकाजासाठी निवेदने देणे, पत्रव्यवहार करणे सोयीचे जावे, यासाठी पिंपरी चिंचवड पक्ष कार्यालयात पवार यांनी त्यांचे दोन स्वीय सहायक नेमले आहेत. ते दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवेदने स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादीच्या पिंपरी, खराळवाडीतील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या याबबत उदासीनता दाखवत कोर्टाचे निर्णयाप्रमाणे निवडणुका होतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहे. राज्याची सत्ता हाती आल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्याची महत्वाकांक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी उराशी बाळगली आहे.
बारामती प्रमाणे पिंपरी चिंचवड शहराशी सतत लोकसंपर्क हे अजितदादा पवार यांचे वैशिष्ट्य आहे. त्याचाच भाग म्हणून आपल्या स्वीय सहायकांना राष्ट्रवादी कार्यालयात हजर ठेवण्याची कल्पना राबविण्यात येत आहे. नागरीकांच्या महापालिका तसेच राज्य सरकाशी संबंधित कामांची सोडवणूक व्हावी यासाठी दोन स्वीय सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.
पक्षाचे कार्यालय हे केवळ पक्ष कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर सामान्य पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठीही हक्काचे व्यासपीठ बनावे, अशी अपेक्षा अजितदादाची आहे. म्हणून आता राज्य सरकारशी संबंधित कामांसाठी व शहरातील नागरिकांचे प्रश्न स्वीकारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार त्यांचे दोन स्वीय सहायक सरकारशी संबंधित कामकाजाबाबतची निवेदने, पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.
तसेच, सार्वजनिक कामांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. या उपक्रमाचा सर्व पिंपरी चिंचवडकरांना वेळ आणि श्रमाच्या दृष्टीने फायदा होणार आहे.