पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर टीका केली. तर नात्यागोत्यांचे राजकारण थांबवा, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
चिंचवड आणि भोसरीच्या भाजप आमदारांनी पिंपरी-चिंचवड शहर वाटून घेतले. ही तुझी आणि ही माझी बाजू असे वाटप केले. या आमदारांनी दुकान न मांडता मॉलच उभे केले आहेत, अशी टीका पवार यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार चिंचवड येथे आजी माजी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते. सुरुवातीला माजी नगरसेवकांनी आपली मते मांडली.
तसेच शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माजी नगरसेवकांना विद्यमान नगरसेवक विश्वासात घेत नसल्याची तक्रारही काही कार्यकर्त्यांनी केली. नात्यागोत्याच्या राजकारणाचा परिणाम शहर राष्ट्रवादीवर झाल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
शहरात नात्या-गोत्यांचे राजकारण चालते. त्यातूनच मावळ लोकसभा मतदारसंघातून तीनहीवेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. २००९ मध्ये आझम पानसरे २०१४ मध्ये राहुल नार्वेकर आणि २०१९ मध्ये पार्थ पवार यांच्या पराभवाला आपलीच लोक कारणीभूत आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत पक्षाने पानसरे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी जाती-पातीचे राजकारण आडवे आले. तर, त्यानंतर नार्वेकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी गाववाले बाहेरचा है हा मुद्दा आडवा आला. त्यानंतर निवडणुकीतही पार्थ पवार उमेदवार असतानाही नातीगोती, गावकी भावकीच्या राजकरणातून लोकांनी मनापासून काम केले नाही. आपल्याच लोकांमुळे पार्थचा पराभव झाल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या.
राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीत सुसूत्रता नाही. कोणत्याही कार्यक्रमात ताळमेळ नसतो अशा तक्रारीही माजी नगरसेवकांनी केल्या. सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविण्यात कार्यकारिणी कमी पडतेय अशीही तक्रार या माजी नगरसेवकांनी केली.
























Join Our Whatsapp Group