मावळ (Pclive7.com):- मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून पवना धरणातून गाळ काढण्याचे काम मागील सहा वर्षांपासून केले जात आहे. यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी देखील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी (दि. 15) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाला. यावेळी उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, उपतालुका प्रमुख अमित कुंभार, संतोष शिंदे, उमेश दहीभाते, तानाजी लायगुडे तसेच शेतकरी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान पवना धरणातून भागवली जाते. पवना धरणातील पाणीसाठ्यावर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा अवलंबून असतो. त्याचबरोबर धरणाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात शेती आहे. या शेतीला देखील धरणातील पाणी दिले जाते. या धरणात मागील काही वर्षात गाळ साचल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला होता. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन त्याचा पिंपरी चिंचवड शहर, परिसरातील शेतीवर मोठा परिणाम होत असे.
मागील सहा वर्षांपासून खासदार श्रीरंग बारणे यांनी स्थानिक शेतकरी आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने पवना धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख अमित कुंभार यांचे याकामी सहकार्य होत आहे. गेल्या सहा वर्षांपासून धरणातील गाळ काढण्याचे काम केले जात आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
धरणातून काढलेला गाळ शेतक-यांना दिला जातो. पवना धरण परिसरात नर्सरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. नर्सरीसाठी देखील या गाळाचा उपयोग केला जातो. पवना धरणात गाळ साचल्याने त्याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असे. मात्र दरवर्षी गाळ काढण्याचे काम केले जात असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली असून त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत आहे.
पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले. धरणाची 9.5 टीएमसी एवढी पाणी साठवणूक क्षमता आहे. या धरणावर पिंपरी चिंचवड शहरासह तळेगाव, देहूरोड, एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्कचा काही भाग अवलंबून आहे. धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 6 टीएमसी (दररोज 510 एमएलडी) पाणी पिंपरी चिंचवड महापालिका उचलते. 1.50 टीएमसी पाणी एमआयडीसी उचलते. तर 1.1 टीएमसी पाणी शेतीसाठी दिले जाते. दरम्यान धरणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठा कमी होऊ लागला. याचा पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ लागला. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी धरणातील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. सन 2014 पासून 52 हजार क्युबिक मीटर गाळ पवना धरणातून काढण्यात आला आहे. आता धरणात एवढा पाणीसाठा जास्त होत असल्याने याचा फायदा होणार आहे. ही अभिनव संकल्पना खासदार श्रीरंग बारणे यांनी सुरु केली. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इतर धरणातील गाळ अशाच पद्धतीने काढला जात आहे.