भोसरी (Pclive7.com):- इंद्रायणीनगर येथील कै. भिवाजी सहाणे सभागृह, गणेश मंदिर, येथे काल (दि.०७) ‘इंद्रायणी युवा प्रतिष्ठान’ आणि ‘तुषार सहाणे युवा मंच’ यांच्या वतीने प्रभागातील १० वी व १२ वी मध्ये ८८ टक्के वरील गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन सोहळ्याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला डॉ. दिपक परदेशी (पुणे वैद्यकीय (Medical) क्षेत्रातील परीक्षा व संधी), डॉ. कैलास सोनावणे (प्रोफेसर), सौ. सुलभाताई उबाळे (शहर संघटिका शिवसेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या), कैलास नेवासकर (समन्वयक पिंपरी चिंचवड शहर शिवसेना), सचिन सानप (जिल्हा प्रमुख युवासेना पिंपरी चिंचवड), श्री. म्हेत्रे साहेब (रिटायर्ड पोलीस अधिकारी), श्रीमती. सुमनताई सहाणे, उद्योजक संतोष तांबे, सुयोग देशपांडे, प्रकाश सहाणे, रूपेश परुळेकर, महेश जगताप, रघुनाथ हांडे, मिननाथ सोनवणे, किरण रोडे, सुरज झांजूर्णे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. दिपक परदेशी सरांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. कैलास सोनावणे सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले. परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले गेले आणि समाजसेवा व शिक्षण यांचा समन्वय कसा साधावा हे सांगितले गेले. विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे महत्त्व उलगडून सांगण्यात आले, पोलिस प्रशासन, उद्योग आणि इतर क्षेत्रात कामगीरी केलेल्या अनुभवांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली गेली.
प्रभागातील इयत्ता १० वी मधून प्रथम क्रमांकावर ‘समीक्षा वसंत चौधरी, द्वितीय क्रमांकावर ‘अनुश्री मानकर’, तृतिय क्रमांकावर ‘आदित्य धनंजय गावडे आणि तसेच इयत्ता १२ वी मधून प्रथम क्रमांकावर ‘हरीश रामाप्पा इम्मंनावर, द्वितीय क्रमांकावर ‘श्रुती मारुती हिंगमिरे, तृतिय क्रमांकावर ‘ओंकार कृष्णानंद गावकर, त्याचबरोबर एकूण १२५ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या अनुभवांच्या कथा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या व त्यांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या प्रवासासाठी योग्य दिशा मिळाली आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील युवकांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवी ऊर्जा मिळते असा विश्वास आयोजक तुषार सहाणे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रश्नोत्तर सत्रात सहभाग घेतला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या शंका दूर करुन त्यांना योग्य मार्गदर्शन दिले, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘इंद्रायणी युवा प्रतिष्ठान व ‘तुषार सहाणे युवा मंच यांच्या सर्व सदस्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
Tags: इंद्रायणी नगरइंद्रायणी युवा प्रतिष्ठानकरियर मार्गदर्शनगुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानतुषार सहाणेतुषार सहाणे युवा मंचशिवसेना




















Join Our Whatsapp Group