पिंपरी चिंचवड महापलिकेचा आज ४० वा वर्धापनदिन
पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराने विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे. ‘कटिबद्धा जनहिताय’ हे ब्रीदवाक्य असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लोकसहभागातून या नगरीला वैभव प्राप्त करून दिले आहेत. यामध्ये मोलाचा वाटा असलेल्या शहरातील कष्टकरी, कामगार, लोकप्रतिनिधी, खेळाडू, शिक्षक, व्यापारी, पोलिस, सैनिक, डॉक्टर, अभियंते, कलाकार, शास्रज्ञ, उद्योजक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणा, आस्थापना, स्वयंसेवी संस्था आणि तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून आणि योगदानातून आजची पिंपरी चिंचवड नगरी घडली आहे, या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.
महापालिकेचा आज ४० वा वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरामध्ये विविध क्षेत्रांत दिवसेंदिवस आमुलाग्र बदल घडत आहेत. महापालिकेच्या प्रत्येक उपक्रमांत असलेला सर्वांचा सहभाग यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अविरत काम करीत आहे. पिंपरी चिंचवड शहराला गौरवशाली इतिहास आणि संतांची परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा अबाधित ठेवून शहराला स्वच्छ व सुंदर तसेच देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी महापालिकेची वाटचाल यशस्वी ठरत आहे. नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ उपक्रमांतर्गत ‘सिटीझन फीडबॅक’ (सर्वोत्तम नागरिक अभिप्राय) मध्ये पिंपरी चिंचवड शहराला देशात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
अल्पावधीत विकासाकडे उत्तुंग भरारी घेतलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याचा वेध घेत महापालिकेच्या वतीने विविध विकासात्मक प्रकल्प साकारले जात आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीने नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालयांसारखी नवीन रुग्णालये उभारण्यात आली असून ती २४ तास अद्ययावत सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. महापालिका क्षेत्रातील किडनीच्या आजारांनी त्रस्त गरजू आणि गरीब रुग्णांकरिता नवीन थेरगाव रुग्णालय येथे डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी शिशु अतिदक्षता विभाग देखील सुरु करण्यात येणार असून गरजू तसेच रुग्णालयात जन्मलेल्या आणि अतिदक्षता विभागातील आवश्यकता असलेल्या नवजात शिशूंना रुग्णालयातच उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांना घराजवळ प्राथमिक उपचार मिळावेत या उद्देशाने शहरात सुसज्ज असे जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. शहर अॅनिमिया मुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरु केलेली ‘मिशन अक्षय’ योजना अतिशय परिणामकारक ठरत आहे.
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राची क्षमता ४८५ एमएलडी आहे या केंद्रासह निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १०० दशलक्ष लीटरने वाढविण्यासाठी प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि भविष्यातील सन २०३१ पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेता आंद्रा आणि भामा आसखेड धरणातील पाणी आणण्याची योजना राबविण्यात आली आहे. आंद्रा पाणीपुरवठा योजनेमध्ये चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, चिखली येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्र ते देहूपर्यंत रायझिंग मेन टाकणे, निघोजे-तळवडे येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे ही कामे सुरु आहेत. यामुळे शहरामध्ये नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रशासकीय सेवा सुविधा अधिक गतिमान करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यातून नागरिकांना सहज आणि सुलभ सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा मुख्य उद्देश आहे. नागरी सहभाग अधिक वाढावा यासाठी महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सारथी प्रणालीला अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. नागरी सहभाग अधिक वाढावा यासाठी महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सारथी प्रणालीला अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. तसेच नागरी संवादासाठी चॅट बॉट प्रणाली सुरु करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातील दुसरी महापालिका आहे. व्हॉटस्अप या माध्यमातून नागरिक आपल्या समस्या तसेच सूचना महापालिकेला थेट कळवू लागले आहेत. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी ग्रीन मार्शल पथकाला हॅण्ड हेल्ड डिव्हाईस देण्यात आले आहेत. यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता आली आहे.
महापालिकेच्या वतीने आता ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. माझी मिळकत माझी आकारणी या उपक्रमाद्वारे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या नवीन मालमत्तेचा संभाव्य मालमत्ता कर जाणून घेऊन नोंदणी व मालमत्ताकर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे मालमत्तेची नोंद करण्यासाठी नागरिकांना कार्यालयात यावे लागत नाही. थकबाकी नसल्याचा दाखला देण्याची ऑनलाईन सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होत आहे.
विकासाची गती साधताना समाजातील सर्व घटकांना, विशेषतः उपेक्षित समुहांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी महापालिकेने विविध योजना तसेच सर्वसमावेशक धोरणांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. तृतीयपंथी समूहाला स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम आणि योजना सुरु केल्या आहेत. शिवाय ग्रीन मार्शल, शलाका कर संकलन पथक, रिव्हर मार्शल स्कॉड, सुरक्षापथक अशा विविध पथकात तृतीयपंथीय घटकांची नेमणूक करण्यात आली आहे. या समूहासाठी अशा महत्वाकांक्षी योजना आणि उपक्रम राबविणारी पिंपरी महानगरपालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे. या उपक्रमामुळे तृतीयपंथीयांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
महापालिकेच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी महिला बचतगटांना ‘नवी दिशा’ उपक्रमांतर्गत काम दिले जात आहे. हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणेची दिशा दाखविणारा असून यातून बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. महापालिकेचे विविध उपक्रम, योजना आणि कार्यक्रम यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच उद्योग समूह आणि कामगार यांचा या कामात सहभाग वाढविण्यासाठी सी.एस.आर. सेल सुरु करण्यात आले आहे. याद्वारे प्राप्त होणाऱ्या निधीतून शहराच्या विकासात हातभार लावला जात आहे. उद्योग सुविधा कक्षाच्या माध्यमातून शहरातील व्यापार आणि उद्योगांची वाढ सुलभ करण्याकरिता तसेच औद्योगिक प्रतिनिधीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महापालिकेच्या उपक्रमांत उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी मदत होत आहे.
औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळाची गरज असते. असे मनुष्यबळ सहज उपलब्ध व्हावे तसेच युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्पादनाभिमुख ट्रेडसचे प्रशिक्षण देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम, मिशन शिष्यवृत्ती, शिक्षक सक्षमीकरण असे उपक्रम राबविण्यात येत असून अध्यापनात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यात येत आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेच्या वतीने संत साहित्य तसेच संगीत शिक्षण देण्यासाठी चिखली येथे ‘संतपीठ’ विकसित करण्यात आले आहे. यामुळे आपल्या मातीत घडलेल्या संतांची ओळख होऊन विद्यार्थ्यांच्या मनात साहित्याप्रती आदर वृद्धिंगत होण्यास मदत होत आहे. या शहराची जडणघडण करताना पारंपरिक संस्कृती जतन करत सांस्कृतिक, क्रीडा, कला, साहित्य परंपरा अधिक वृद्धींगत होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे.
नेहरूनगर येथे भटक्या तसेच पाळीव प्राण्यांसाठी उपचार व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अॅनिमल शेल्टर हाऊस सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक भटक्या श्वानांवर उपचार केले जातात. नुकतेच महापालिकेच्या वतीने भटकी कुत्री आणि मांजरांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.
विविध उपक्रम राबवून जागतिक पातळीवर या शहराची स्वतंत्रपणे ओळख व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास करताना नागरी सहभागामुळे ‘स्वच्छाग्रह’ अभियानातून हे शहर देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर होईल असा विश्वास आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका शहरामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. शहरात आज रोजी ४८ टक्के ग्रीन कव्हर आहे. त्यात आणखी वाढ करण्यासाठी मियावाकी उद्यानांची निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील काही उद्यानांचे नुतनीकरण केले आहे. तर काही उद्याने पर्यटन केंद्राच्या दृष्टीने नव्याने विकसित केली आहेत. पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान, सांगवी येथील ८ टू ८० पार्क, संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यान अशा काही उद्यानांचा यात समावेश आहे. बर्ड व्हॅली उद्यानात संगीतमय कारंजे आणि लेझर शो सुरु करण्यात आला आहे. तसेच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानातील तळ्याभोवती लावण्यात आलेल्या सौरउर्जेवर प्रकाशित होणाऱ्या नाविन्यपूर्ण विद्युत रोषणाईमुळे हे उद्यान नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. महानगरपालिकेने विविध आस्थापनांना कर सवलत देताना स्वच्छाग्रह अभियानात नागरी सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. ग्रीन स्कूल-झिरो वेस्ट या तत्वावर किमान पहिली ते दहावी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे अशा शैक्षणिक संस्थांच्या इमारतीत कंपोस्टिंग यंत्रणा, झिरो वेस्ट संकल्पना, रेनवॉटर हार्वेस्टिंग व सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित असल्यास त्यांना सामान्य करात भरीव सवलत दिली जाणार आहे. अशी योजना सुरु करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकमेव महानगरपालिका ठरली आहे.
महापालिकेच्या वतीने ‘वेस्ट टू बेस्ट’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून सुशोभिकरणासाठी अनेक वस्तू बनविण्यात येत आहे. अनेक उद्यानांमध्ये जुने टायर, वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर भंगार साहित्यापासून सुशोभिकरणाच्या वस्तू बनवल्या आहेत. तसेच शहरातील काही ठिकाणी वेगवेगळ्या थीम आणि संकल्पनेवर आधारित स्मारके तयार करण्यात आली आहेत. यामाध्यमातून नागरिकांमध्ये कचऱ्यापासून नवनिर्मिती या संकल्पनेला प्रोत्साहन मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून नावलौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहराला क्रीडाभूमी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शहरात विविध क्रीडासंबंधी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शहरात नुकतेच महापालिका आणि सीएमई यांच्या संयुक्त विद्यमाने रोईंग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली असून याठिकाणी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना रोईंग खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षी महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानावर राष्ट्रीय पातळीवर हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे हॉकी इंडियाच्या वतीने महापालिकेला आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी देऊ केली आहे. थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होत आहेत. तसेच शहरातील कुस्तीगीरांना प्रशिक्षण देण्यासाठी भोसरी येथे पै.मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर याठिकाणी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रांमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळत आहे.
नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा शहरामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका २० ठिकाणी खाजगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. इलेक्ट्रीक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता महापालिकेने पुढाकार घेतला असून प्रदूषणमुक्त शहरासाठी हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. फायर फायटर मोटार सायकल्समुळे पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरुंद रस्ते, गल्ली, मार्केट परिसर अशा ठिकाणी तातडीने आणि सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी मदत होत आहे. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी तसेच रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठी ही यंत्रणा या मोटार सायकल्समध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग ची आवश्यकता असते. यासाठी महापालिकेच्या वतीने पोलिसांना स्मार्ट मोटारसायकल देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा विचार करून महापालिकेच्या वतीने विविध कार्यालये, रुग्णालये, उद्याने तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अत्याधुनिक यंत्रणेवर आधारीत उच्च तांत्रिक परिमान असलेले व प्रगत देशात उत्पादित केलेले संपूर्ण शहरात ७६६६ चार मेगापिक्सेलचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी संपूर्ण भारतामध्ये प्रथम क्रमांकाची महानगरपालिका आहे.
खगोलशास्त्राच्या अभ्यासाकरिता शहरामध्ये चिंचवड येथील विज्ञान केंद्र याठिकाणी तारांगण उभारण्यात आले आहे. विज्ञान केंद्र येथे उपलब्ध असलेल्या विज्ञान विषयक माहितीसह एकाच जागेत खगोलशास्त्र विषयक माहिती विद्यार्थी आणि नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या तारांगणात आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह,तारे,नक्षत्र तसेच ग्रहण याविषयी प्रत्यक्ष ऑप्टोमेकॅनिकल आणि २ डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब्रीड कॉन्फिगरेशन सिस्टिमद्वारे प्रत्यक्ष अनुभवातून माहिती घेता येणार आहे. संपूर्ण भारत देशातील चार तारांगणांपैकी हे एक तारांगण आहे.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन२०२१- २२ या वर्षाकरीता राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार, गव्हर्नन्स तसेच लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमांत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावत बहुमान मिळवला. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय निर्माण भवन, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित “ ७ व्या स्मार्ट सिटीज इंडिया २०२२” आणि “२९ व्या कन्व्हर्जन्स इंडिया २०२२” एक्स्पोमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला “ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहराने शहरी ई-प्रशासन निर्देशांक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गेल्या दोन दशकांमध्ये पिंपरी चिंचवडने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हब म्हणून एक नवीन ओळख प्रस्थापित केली आहे. महापौर परिषदेतर्फे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या वैभवशाली शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वव्यापी स्मार्ट शहर बनवण्याचा घेतलेला ध्यास निष्ठेने पुढे नेण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आणि योगदान निश्चितपणे मिळत असून ते यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा आहे, धन्यवाद…!
शेखर सिंह
आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.