पिंपरी (प्रतिनिधी):- सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदूषण, ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रदूषणमुक्त निरोगी वातावरणासाठी कुठेही पर्यावरणाचा -हास होणार नाही, याची दक्षता विद्यार्थ्यांपासून सर्वांनी घेतली पाहिजे. स्वच्छ व निरोगी वातावरणासाठी यंदाची दिवाळी प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा पिंपरी चिंचवड शहरवासियांनी संकल्प करावा, असे कळकळीचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. नागरिकांनी निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा -हास होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या वापरामुळे प्रदूषण वाढते, त्याचा वापर टाळायला हवा.
पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड तरी लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. वर्षभरातील सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. देशातील भावी पिढीला पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्यावर शाळेतच पर्यावरणाचे रक्षण करण्याचे संस्कार झाले पाहिजेत. दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर करु नये. येणारी दिवाळी ही प्रदूषणमुक्त साजरी करावी असे आवाहन, अमित गोरखे यांनी निवेदनातून शहरवासियांना केले आहे.
राज्य सरकार प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. यानिमित्ताने होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने दिवाळीत ‘प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान’ राबविण्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाने केली आहे.
राज्य सरकारच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन आणि शहाराचे वातावरण स्वच्छ व प्रदूषण मुक्त राहण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करावा. पिंपरी चिंचवडकर नागरिक चांगल्या कार्यासाठी नेहमीच पुढे असतात. त्यामुळे शहराचे वातावरण प्रदूषण मुक्त राहण्यासाठी शहरवासिय प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करतील, असा विश्वासही गोरखे यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.























Join Our Whatsapp Group