पिंपरी (Pclive7.com):- शालेय जीवनात मुले मैदानी खेळ, स्पर्धा विसरले असून, जास्तीत जास्त वेळ मोबाईल वापरण्यात व्यस्त दिसत आहेत. यामुळे भावी पिढी बरबाद होत असून, किमान शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोबाईल बंदी करा, असे आवाहन हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले. थेरगाव येथे दत्तमूर्ती स्थापनेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कीर्तन कार्यकमात ते बोलत होते.

इंदुरीकर महाराज म्हणाले, शालेय जीवनात मुलांना महागड्या मोबाईलची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करून, मुले शाळेच्या आवारात, वर्गात मोबाईलवर वेळ घालवतात. तसेच, शिक्षक सुद्धा शिकवताना फोन आल्यावर बाहेर जाऊन मोबाईलवर बोलत बसतात. हे सर्व चिंताजनक असून, किमान शाळेच्या आवारात मोबाईल वापरावर बंदी असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी शासन दरबारी काही नियमावली करता येते का त्यासाठी संसदेत प्रयत्न करण्याचं आवाहन इंदुरीकर महाराजांनी खासदार श्रीरंग बारणे यांना केले.
आपापसात भांडणे करून उपयोग नाही, संयम बाळगा, मुलांना थोडं तरी सांप्रदायाचे शिक्षण द्या, किमान धर्म वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माणसाला जिवंत राहण्यासाठी शुद्ध ऑक्सिजनची गरज असून, कोरोना महामारीत सर्वांनी याचा कटू अनुभव घेतला आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे घराभोवती तुळशी लावणे गरजेचे आहे. असे आवाहन इंदुरीकरांनी उपस्थितांना केले.
Tags: indurikar maharaj






















Join Our Whatsapp Group