पिंपरी (Pclive7.com):- देशातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वेच्या तिकीट दरात देण्यात येणारी 50 टक्के सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
खासदार बारणे म्हणाले, पत्रकार रात्रंदिवस कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावतात. कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असतानाही पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावत लोकांना जागरुक करून महत्त्वाची माहिती दिली. आपल्या कर्तव्याबाबत सदैव जागरुक राहिले. तर, देशातील अनेक पत्रकार कोरोनाचे बळीही ठरले आहेत. कोरोना महामारीपूर्वी देशातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी भाड्यात 50 टक्के सवलत मिळत होती.
पत्रकार त्यांचे कर्तव्य बजावत होते. पण, कोरोनाच्या काळात रेल्वे गाड्या बंद झाल्या आणि नंतर पत्रकारांना रेल्वे भाड्यात देण्यात येणारी 50 टक्के सवलतही बंद करण्यात आली आहे. आता देशातील कोरोनाची परिस्थिती सामान्य झाली आहे. सर्व रेल्वे गाड्या पूर्वीप्रमाणे धावू लागल्या आहेत, मात्र पत्रकारांना रेल्वे भाड्यात 50 टक्के सवलत देणे बंद झाले आहे. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांना माझी विनंती आहे की, पत्रकारांना दिलेली रेल्वेच्या तिकीट दरातील 50 टक्के सवलत पूर्ववत करण्यात यावी.